Mon, Sep 16, 2019 11:34होमपेज › Pune › भाजपला ‘लक्ष्य’ करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

भाजपला ‘लक्ष्य’ करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

Published On: Aug 03 2018 1:37AM | Last Updated: Aug 02 2018 11:59PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर 

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ‘लक्ष्य’ करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या तरुणांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेऊन काढलेला सर्वपक्षीय कँडल मार्च, पवना बंदिस्त जलवाहिनीवरून भाजपला केलेले लक्ष्य, महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज ही त्याची उदाहरणे आहेत.
मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान केलेल्यांना  सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादीने निगडी भक्ती-शक्ती येथे कँडल मार्च काढला. त्यास भाजप वगळता सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली.

मराठा  समाजाने  पालखी  निघते तसे शिस्तबद्ध 58 मोर्चे काढले, तरीही झोपलेले सरकार जागे व्हायला तयार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकार कुचकामी ठरले, तर लोक सरकारला सत्तेवरून खाली खेचतील, असा इशारा माजी आमदार विलास लांडे यांनी यावेळी दिला. या कँडल मार्चमुळे मराठा समाजाचे जागरण झालेच, त्याबरोबरच भाजपला लक्ष्य करण्याची संधी राष्ट्रवादीने साधली.
चापेकर संग्रहालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात पवना बंदिस्त जलवाहिनीच्या प्रश्नाबाबत शेतकर्‍यांना न्याय देऊ, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. मात्र, पवना बंदिस्त जलवाहिनीला कालही विरोध होता, आजही आहे आणि उद्याही तो कायम राहणार, असे विधान आमदार बाळा भेगडे यांनी केले.

त्यामुळे राष्ट्रवादीला भाजपवर टीकेची संधी चालून आली. बंदिस्त जलवाहिनी योजना मार्गी लावण्याची भाजपची घोषणा वल्गना  ठरल्याची टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. पिण्याच्या पाण्याचे पुढील तीस वर्षांचे नियोजन करत राष्ट्रवादीने 2007 मध्ये ही योजना आणली. परंतु, मावळातील शेतकर्‍यांच्या विरोधामुळे ही योजना पूर्णत्वास गेलेली नाही. भाजपने सत्तेवर आल्यानंतर ही योजना पूर्णत्वास नेण्याची घोषणा केली, पण कोणतेही ठोस पाऊल उचलेले नाही. उलट आमदार बाळा भेगडे यांनी पवना बंदिस्त जलवाहिनीला विरोध कायम राहणार असल्याचे सांगितले. हा विरोधाभास सांगत साने यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

येत्या शनिवारी महापौर, उपमहापौरपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने महापौरपदासाठी भाजपच्या राहुल जाधव यांच्याविरोधात विनोद नढे, तर उपमहापौरपदासाठी सचिन चिंचवडे यांच्याविरोधात विनया तापकीर यांना रिंगणात उतरवले आहे. बहुमतामुळे भाजपचा विजय निश्चित आहे. मात्र, निवडणूक बिनविरोध होऊ नये, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न दिसत आहे. 

महापालिका स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीत भाजपच्या ममता गायकवाड यांच्या विरोधातही राष्ट्रवादीने मोरेश्वर भोंडवे यांना रिंगणात उतरवून भाजपमधील नाराजीचा लाभ मिळतो का, याचा अंदाज घेतला होता. अर्थात भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्याच वर्षी महापौर व उपमहापौरपद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने दाखल केलेले श्याम लांडे व निकिता कदम यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. हे लक्षात घेता या वेळी तरी राष्ट्रवादी अर्ज कायम ठेवणार का, याबाबत उत्सुकता आहे.