Sun, Aug 18, 2019 06:20होमपेज › Pune › पालिका आयुक्तांना मारहाण; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

आयुक्तांना मारहाण; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Published On: Feb 12 2019 2:20PM | Last Updated: Feb 12 2019 2:20PM
पुणे : प्रतिनिधी

जलपर्णीच्या वादग्रस्त निविदेवरून महापौरांच्या दालनात अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना सोमवारी मारहाण झाली. या घटनेच्या निषेधार्थ पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याप्रकरणी नगरसेवक अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. 

जलपर्णीची निविदा आठपट दराने काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारी दुपारी महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनातील बैठकीत आंदोलन केले. या आंदोलनात दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली. हे आंदोलन सुरू असताना अति. आयुक्त निंबाळकर निविदेसंदर्भात माहिती देत होते.

"ज्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली निविदा प्रक्रिया राबवली, त्यांच्याकडून खुलासा नको. अधिकारी चोर आहेत", असा आरोप नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला. त्यावेळी प्रत्युत्तर देताना "असे ऐकून घ्यायला आलो नाही, तुमची काय लायकी आहे का ?" असे निंबाळकर यांनी वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. "तुम्ही आमची लायकी काढणारे कोण ?" असे म्हणत धावून आल्याने चांगलाच गोंधळ झाला. या गोंधळात एका कार्यकर्त्याने निंबाळकर यांना मारहाण केली. हा गोंधळ चिघळण्याची चिन्हे दिसताच सुरक्षा रक्षकांनी निंबाळकर यांना महापौर दालनाच्या बाहेर नेले. 

या घटनेनंतर रात्री उशीरा निंबाळकर यांनी नगरसेवक शिंदे व धंगेकर यांच्यासह १४ ते १५ कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सकाळी पालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी पालिका भवनासमोर जमा झाले असून येथील महात्मा फुले पुतळ्यासमोर निषेध सभेचे आयोजन केले आहे. 

गुन्हा दाखल झालेल्यांना त्वरीत अटक करावी, अन्यथा बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.अधिकाऱ्यांना चुकीची कामे करण्यास कोण भाग पाडते, हे जाहीर करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असाही इशारा देण्यात आला. 

स्थायी समितीच्या बैठकीला कोणीही अधिकारी उपस्थित राहणार नसल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

भ्रष्टाचार कोण करते, त्याला आळा घालणाऱ्या अधिकाऱ्यांना कोण जिवे मारते, त्यांची बदली कोण करते, हे सर्व जनतेला माहिती आहे. राजकारण्यांनी स्वच्छ असल्याचा आव आणू नये. काल निंबाळकर यांना झालेली मारहाण निषेधार्य आहे. या लढ्यात आम्ही कामगार अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहोत.

- कॉ. मुक्ता मनोहर, कामगार नेत्या

ही दुदैवी घटना असून या घटनेची दखल शासन आणि प्रशासनाने घेतली आहे. पालकमंत्र्यांनी वारंवार घटनेची माहिती घेतली आहे. या घटनेची सर्व कायदेशीर कार्यवाही केली जाईल. आपले संघटन आणि अन्यायाविरोधात लढा सुरूच राहणार आहे. जनतेचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्वानी काम सुरू करावे.

- सौरभ राव, महापालिका आयुक्त