Mon, Sep 16, 2019 12:20होमपेज › Pune › मराठी रंगभूमी दिन :  उद्योगनगरीत रंगभूमीला वाढता प्रतिसाद

मराठी रंगभूमी दिन :  उद्योगनगरीत रंगभूमीला वाढता प्रतिसाद

Published On: Nov 05 2018 1:26AM | Last Updated: Nov 04 2018 11:49PMपिंपरी ः पूनम पाटील

5 नोव्हेंबर हा दिवस ’मराठी रंगभूमी दिन’ म्हणून ओळखला जातो. मराठी रंगभूमीतून आजवर कसदार अभिनेते उदयास आले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्येही मराठी रंगभूमी हळूहळू विस्तारीत होऊ लागली असून आजवर शहरातील अनेक कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीत शहराचे नाव उंचावले आहे. शहरात बालरंगभूमीलाही चांगला प्रतिसाद मिळत असून, दरवर्षी 

बालनाट्यस्पर्धेच्या माध्यमातून भविष्यातील कलाकार निर्माण होतील. मात्र पिंपरी-चिंचवडमधील रंगकर्मींना जर तालमीसाठी पूर्णवेळ जागा तसेच इतर प्राथमिक गरजांची पूर्तता केली तर शहरातून निश्‍चितच उत्तम कलाकार तयार होतील, अशी आशा शहरातील ज्येष्ठ रंगकर्मींनी केली आहे. 

मराठी रंगभूमी ही जिवंत रंगभूमी आहे. मराठीतील अनेक दर्जेदार नाट्यकलाकृती आजही रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत. नवीन पिढी आजही डीजीटलायझेशनच्या जमान्यात नाट्यकलेकडे वळत आहे. शहरात अखिल भारतीय मराठी नाट्य परीषदेच्या माध्यमातून तसेच विविध नाट्यसंस्थांच्या माध्यमातून आजवर अनेक तरुण कलाकार त्याचप्रमाणे बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून बालकलाकार घडवण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या आधुनिक युगात मराठी रंगभूमीला निश्‍चितच चांगले दिवस येणार असल्याचे शहरातील रंगकर्मींनी सांगितले. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे आधे अधुरे, भक्ती बर्वे अभिनीत तू फुलराणी, मोहन आगाशे यांचे घाशीराम कोतवाल, चंद्रकांत काळेंचे बेगम बर्वे व निळू फुले यांचे सखाराम बाईंडर ही नाटके आजही रसिकांच्या मनात ठसलेली आहेत. 

शहरात नाट्यचळवळ वेगाने सुरू असून आजही शहरात कलेवर मनापासून प्रेम करणारी माणसे आहेत. लवकरच शहरात युथ फेस्टीवल होणार आहे. दरवर्षी गडकरी करंडक स्पर्धा तसेच बालनाट्य शिबीर यासह विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्यामुळे नवनवीन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होत आहे. नवोदीतांनी केवळ चित्रपटासाठी नाटकात काम करु नये तर नाटकातील प्रत्येक भूमिका भरभरुन जगावी, असे आवाहन ज्येष्ठ रंगकर्मीनी केले आहे. मात्र आजही केवळ वर्चस्ववादी लोकांनाच इतरांचे कार्यक्रम रद्द करून तालमीसाठी व नाटकाच्या बुकींगसाठी प्राधान्य दिले जाते. असे न होता सर्वांनाच कायम तालमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असे आवाहन रंगकर्मींनी मराठी रंगभूमी दिनानिमित्त केेले आहे. 

तालमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी

मागणी करूनही अजूनही रंगीत तालमीसाठी कलाकारांना पुरेशी जागा मिळत नाही, नाटकांसाठी केवळ शनिवारी किंवा रविवारीच नाट्यगृहांचे बुकिंग मिळते. परंतु इतर दिवशीही रसिकांना नाटके बघाविशी वाटतात. त्यामुळे नाट्यगृहांमध्ये आठवड्यातील कोणत्याही दिवशी नाटकासाठी बुकिंग करता आली पाहिजे. तसेच महापालिकेनेही नाट्यसंस्कृती जिवंत ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. 
 -योगेश दळवी,     निर्माता-दिग्दर्शक

शहरात गेली वीस वर्षांपासून अधिक काळ मराठी रंगभूमीसाठी व नाट्यसंस्कृती टिकून राहण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेसारख्या संस्था कार्यरत आहेत, त्यामुळे कलाकार घडत आहेत. शॉर्टफिल्मसच्या माध्यमातून अनेक कलाकार एकत्र येत असून रंगभूमीकडे युवा वर्ग अधिक वळत आहे. मधला काही काळ वगळता शहरातील नाट्यचळवळ वेगाने विकसित होत असून अनेक ज्येष्ठ रंगकर्मी नाट्यसंस्कृती जपण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमी काळाच्या ओघात बंद न पडता दिवसेंदिवस अधिक समृध्द होत आहे.  - किरण येवलेकर,  दिग्दर्शक, अभिनेता.