Tue, Sep 17, 2019 03:56होमपेज › Pune › मनसे ना चर्चेत.. ना कसल्या तयारीत.!

मनसे ना चर्चेत.. ना कसल्या तयारीत.!

Published On: Feb 20 2019 1:36AM | Last Updated: Feb 20 2019 1:25AM
पुणे : प्रतिनिधी

गत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातून निवडणूक लढविली आणि जवळपास लाखभर मते घेतली. या वेळेस मात्र मनसे पुण्यात तरी निवडणुकीच्या वातावरणापासून अद्याप दूरच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत मनसेला सहभागी करून घेण्याची चर्चा सुरू आहे. त्यावरच आता मनसे लोकसभेच्या आखाड्यात पुण्यातून उतरणार का, हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत खडकवासल्याची जागा जिंकून आणि अन्य मतदारसंघात लक्षवेधक मते घेत मनसेने राजकीय जाणकारांना तोंडात बोटे घालायला लावली होती. त्यानंतर 2012 च्या महापालिका निवडणुकीत तब्बल 29 नगरसेवक निवडून आणत मनसेचे थेट विरोधी पक्षनेतेपदही पटकावले. मनसेचा पुण्यातील हा आलेख उंचावत असताना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने उडी घेतली. मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांना त्यात 93 हजार मते मिळाली व ते तिसर्‍या क्रमांकावर राहिले. त्यानंतर मात्र, मनसेचा हा आलेख घसरत गेला. 2017 च्या पालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांची संख्या थेट 2 वर घसरली. त्यामुळे आता शहरातील मनसेची ताकद नगण्य झाली आहे. अशा परिस्थितीत आता मनसे लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी भाजपवर सातत्याने टीका करणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राष्ट्रवादीशी सलगी वाढली आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आता जवळपास निश्‍चित आहे. या आघाडीत मनसेलाही समावून घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. मनसे आघाडीबरोबर गेल्यास पुण्यासारख्या शहरात आघाडीच्या उमेदवाराला नक्कीच फायदा होऊ शकणार आहे. काँग्रेसचा मात्र मनसे आणि एमआयएमला घेण्यास विरोध आहे. त्यामुळे मनसेबाबतचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. आघाडीत मनसेला स्थान न मिळाल्यास मनसेची काय भूमिका राहणार हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मनसेला आघाडीबरोबर घेतल्यास ज्या पक्षाकडे पुण्याची जागा जाईल त्याचे काम मनसैनिकांना करावे लागेल. मात्र, आघाडी न झाल्यास मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का आणि उमेदवार कोण असणार, असे सर्वच प्रश्‍न अद्यापतरी अनुत्तरितच आहेत. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex