Sat, Sep 21, 2019 06:32होमपेज › Pune › वंचितांसाठी ज्ञानज्योत चेतविणारी ‘सबला’

वंचितांसाठी ज्ञानज्योत चेतविणारी ‘सबला’

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 12:12AMपिंपरी : पूनम पाटील

हल्लीच्या धावपळीच्या युगात श्‍वास घेण्याचीही उसंत नसताना आजही वस्तीमधील मुलांना शिकवून आदर्श पिढी निर्माण करण्यासाठी चिंचवडमधील एक शिक्षिका गेली कित्येक वर्षे झटत आहे. लक्ष्मी गालफाडे असे तिचे नाव असून, आदर्श पिढी  घडवण्याबरोबरच महिला सक्षमीकरणाचे कामही त्या मागील अनेक वर्षांपासून करत आहेत. 

बिकट परीस्थितीत, प्रसंगी पालकांचा रोष पत्करून मुलींना सक्षम बनवणारी शिक्षिका व निराधार व असहाय महिलाांना स्वतःच्या पायावर उभे करणारी समाजसेविका अशा कितीतरी भूमिका लक्ष्मी पार पाडत आहे. चिंचवडमधील आनंदनगरमध्ये लहानाची मोठी झालेली लक्ष्मी अनंत गालफाडे परिस्थितीशी दोन हात करत दहावी पास झाली. आसाराम कसबे, बेलसरे सर हे गुरूच्या रूपाने भेटले व आपल्या आयुष्याला नवीन दिशा मिळाल्याचे ती अभिमानाने सांगते.

सोमाटणे फाटा येथील वनस्थळी या संस्थेच्या माध्यमातून लक्ष्मीने बालवाडी शिक्षिकेचा कोर्स पूर्ण केला. परंतु कुठल्याही पगाराच्या अपेक्षेने नोकरी न पत्करता तिने एक वेगळी वाट चोखाळली. चिंचवड आनंद नगरमध्येच तिने मुलांना मोफत शिकवणी देण्यास सुरुवात केली. त्यांना पुस्तकाची व शिक्षणाची गोडी कशी लागेल यासाठी प्रयत्न सुुरू केले. सुरुवातीला संघर्ष केल्यानंतर हळूहळू मुले जमू लागली. लक्ष्मीने आजवर किमान तीस मुलींना बालवाडीचे प्रशिक्षण देऊन या कामात सहभागी करून घेतले आहे. याकामी आपल्याला आई, भाऊ तसेच पतीचा मोठा सपोर्ट असल्याचे त्यांनी सांगितले. 
निराधार महिलांना स्वावलंबी बनवलेकोणताही मोबदला न घेता निराधार महिलांना सक्षम बनवत लक्ष्मीने अनेक संसार उभे केले आहेत. आनंदनगरमधील दहा बाय दहाच्या खोलीत कित्येक वर्षे लक्ष्मीने हा वसा सुरू ठेवला. या नि:स्वार्थ सेवेबद्दल नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित केले.

सुरुवातीला मुलांना बोलावण्यासाठी गेलो, तर पालक तोंडावर दार लावत. प्रसंगी अंगावर कुत्रीही सोडत. हिंमत न हारता प्रयत्न सुरू ठेवले. पालकांचा विरोध मावळला. मुलांनी जेव्हा छान गाणी गायला सुरुवात केली, तेव्हा इतर मुलांनाही गोडी निर्माण झाली. त्यानंतर पालकच मुलांना घेऊन येऊ लागले. सध्या भोसरीतील सद्गुरूनगरमध्ये जाऊन नंदीबैलवाल्यांच्या मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करते आहे. या समाजात सहा ते सातव्या वर्षीच लग्न लावले जाते. त्यांच्या पालकांना त्याचे तोटे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. हा समाज आजही पिछाडलेला आहे. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत.        - लक्ष्मी गालफाडे, शिक्षिका