होमपेज › Pune › वाहन परवाना नसणारे शेकडो कर्मचारी चालवितात बस  

वाहन परवाना नसणारे शेकडो कर्मचारी चालवितात बस  

Published On: Oct 16 2018 1:42AM | Last Updated: Oct 16 2018 12:39AMपुणे ः नवनाथ शिंदे

पीएमपीएल डेपोमध्ये बस दुरुस्तीचे काम करणार्‍या तब्बल 976 कर्मचार्‍यांकडे वाहन चालविण्याचा परवानाच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वाहन चालविण्याचे तंत्र माहिती नसताना आणि परवाना नसताना हे कर्मचारी सर्रास बस चालवित असल्याने प्रशासन अपघात होण्याची प्रतिक्षा करीत आहे का, हा सवाल उपस्थित होत आहे.

महामंडळाच्या 13 डेपोच्या कार्यशाळेतील 1 हजार 203 कर्मचार्‍यांपैकी फक्त 74 कर्मचार्‍यांकडे अवजड (हेवी) वाहनांचा परवाना आहे. तर 141 कर्मचार्‍यांकडे लाइट मोटार वाहन परवाना आहे. उर्वरित 976 जणांकडून राजरोजपणे बसेस दुरुस्तीदरम्यान बुंगाट पळविल्या जात आहेत. त्यामुळे अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल प्रवासी संघटनांनी विचारला आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार प्रवासी आणि मालवाहतूक करणार्‍या वाहनचालकांना अवजड वाहन परवाना आवश्यक आहे. त्यासाठी पीएमपीएलचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये परिपत्रक काढून डेपोतील कर्मचार्‍यांना लायसेन्स सक्तीचे केले होते. 

त्यामुळे 227 कर्मचार्‍यांनी हेवी आणि लाइट वाहन परवाना काढण्यास प्राधान्य दिले होते. मात्र, त्यांच्या बदलीनंतर लायसेन्स न काढता डेपोतील कर्मचार्‍यांकडून अधिकार नसतानाही विनापरवाना बसेसचे तांत्रिक काम करताना वाहन चालविणे, वाहनांचे टेस्टिंग करणे, गाडी पुढे-मागे घेतली जाते. 

विशेषतः महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडेच्या कार्यालयाखाली असलेल्या  स्वारगेट मध्यवर्ती कार्यशाळेत सर्वाधिक 165 कर्मचारी कार्यरत असून, त्यांपैकी फक्त 11 जणांकडे हेवी लायसेन्स आहे. 

तर 49 जणांकडे लाइट वाहन परवाना असल्याची नोंद महामंडळाकडे आहे. संबंधित डेपो कर्मचार्‍यांना विना परवाना बस चालविण्यास अधिकार्‍यांची मूकसंमती असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 कारवाईकडे लक्ष

डेपोमध्ये विना परवाना बसेस चालविणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाच्या कारवाईकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. बेशिस्तांवर कारवाई करताना विविध डेपोतंर्गत अपघाताची तमा न बाळगता काम करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.