होमपेज › Pune › स्वतंत्र आयुक्तालयात 15 ठाणी

स्वतंत्र आयुक्तालयात 15 ठाणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : अमोल येलमार

 पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय करण्याचे आश्‍वासन भाजपच्या सर्वच नेत्यांनी यापूर्वी अनेकदा दिले आहे; मात्र सध्या हे आश्‍वासन पूर्ण होणार असे चित्र दिसत आहे; कारण शहरातील सर्वच प्रशासन यंत्रणा मनापासून स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठी काम करताना दिसत आहे. नव्याने होणार्‍या पोलिस आयुक्तालयाच्या प्रस्तावात सध्या तरी पंधरा पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.

नवी मुंबईच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडचे नवीन पोलिस आयुक्तालय होणार आहे. याचे आयुक्तपद अप्पर पोलिस महासंचालक किंवा विशेष पोलिस महासंचालक दर्जाचे असण्याची शक्यता आहे. यामध्ये पंधरा पोलिस ठाण्यांचा समावेश होणार आहे. पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत दहा पोलिस ठाण्यांचा आणि ग्रामीणच्या पाच पोलिस ठाण्यांचा यात समावेश होणार आहे. पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी, सांगवी, हिंजवडी, वाकड, दिघी आणि नव्याने सुरू होणारे चिखली पोलिस ठाणे; तसेच पुणे ग्रामीणच्या देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, आळंदी व चाकण या ठाण्यांचा समावेश आहे. 

पंधरा पोलिस ठाणी दोन परिमंडळांत (उपायुक्त) विभागली जाणार आहेत. चिंचवड, सांगवी, वाकड, हिंजवडी, निगडी, पिंपरी, तळेगाव, देहूरोड पोलिस ठाणे एका परिमंडळामध्ये आणि तळेगाव एमआयडीसी, चाकण, आळंदी, दिघी, एमआयडीसी भोसरी, भोसरी आणि चिखली ही पोलिस ठाणे दुसर्‍या परिमंडळामध्ये असण्याची शक्यता आहे. यासारखे चार सहायक आयुक्त असतील. वाहतूक विभागासाठी एक उपायुक्त आणि दोन सहायक आयुक्त असतील; तसेच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त हेही असतील. त्यांच्याकडे विशेष शाखा, मुख्यालय, नियंत्रण कक्ष, वायरलेस हे विभाग सोपविले जाऊ शकतात. गुन्हे शाखेची दोन ते तीन युनिट तयार केली जातील, असा प्राथमिक आराखडा आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पोलिस आयुक्तालयास ‘ग्रिन सिग्नल’ मिळाल्यानंतर सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. शहरातील महापालिका आणि प्राधिकरणाच्या रिकाम्या इमारतींची पाहणी सुरू केली आहे; तसेच शहरामध्ये साधारणतः 40 एकर मुख्यालयासाठी आणि 10 एकर आयुक्तालयासाठी कोणती जागा योग्य ठरेल याचीही चाचपणी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके, परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांची एकत्र बैठक झाली आहे. 

आयुक्तालयासाठी हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनीची मोकळी जागा; तसेच प्राधिकरण सेक्टर 16 मधील जागा मुख्यालयासाठी, डांगे चौक थेरगाव येथील गायरान जागा आणि काळेवाडी फाटा येथील मोकळी जागा यावर चर्चा सुरू आहे. तत्काळ घोषणा झाल्यास प्राधिकरणाची जुनी इमारत किंवा नव्या इमारतीमधील चार मजले मिळाल्यास कामकाज सुरू होईल.

Tags : Pune, Pune News, working, Independent, Police, Commissionerate


  •