Thu, Apr 25, 2019 12:20होमपेज › Pune › स्वातंत्र्यदिनी चूल बंद

मराठा आरक्षण; स्वातंत्र्यदिनी चूल बंद

Published On: Aug 11 2018 1:28AM | Last Updated: Aug 11 2018 1:28AMपुणे : प्रतिनिधी

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी 15 ऑगस्टची मुदत देत, स्वातंत्र्यदिनी राज्यव्यापी ‘चूल बंद’ आंदोलन करण्याची घोषणा सकल मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी केली. गुन्हे मागे  घेण्यासह अन्य मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत 15 ऑगस्टपासून दररोज चक्री उपोषण करण्याचा इशाराही संयोजकांनी दिला. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या हिंसक घटनांशी आमचा काहीही संबंध नसल्याचेही संयोजकांनी स्पष्ट केले आहे. हिंसक घटना टाळण्यासाठी यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले.

पुणे जिल्ह्याच्या वतीने दि. 9 ऑगस्ट रोजीच्या महाराष्ट्र बंदबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 ते 1 या वेळेत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला होता. परंतू, त्यानंतर घडलेल्या गोंधळाचा मराठा क्रांती मोर्चाशी संबंध नसल्याचा खुलासा सकल मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, विकास पासलकर, बाळासाहेब आमराळे, विराज तावरे, धनंजय जाधव आणि सचिन आडकेर उपस्थित होते. यावेळी बोलताना कुंजीर म्हणाले की, वास्तविक पाहता पुणे जिल्हा समन्वयकांकडून फक्‍त जिल्हाधिकारी कार्यालय येथेच 11 ते 1 दरम्यान ठिय्या आंदोलन घेण्यात आले होते.

निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन संपल्याचे संयोजकांकडून जाहीरदेखील करण्यात आले होते. परंतु, तेथे काही बाहेरील शक्‍तींनी प्रवेश करीत आंदोलनाला बदनाम करण्यासाठीच अशा प्रकारचे तोडफोड केली. दरम्यान, चाकण येथे घडलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान काही मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे; परंतु अद्यापही त्याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे दि. 15 ऑगस्टपूर्वी या आंदोलकांवर असलेल्या खोट्या गुन्ह्यांसह राज्यभर मराठा आंदोलनकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेतले नाही तर एक दिवसांचे चूल बंद आंदोलन करुन आत्मक्‍लेश करून घेण्यात येणार आहे.

या आंदोलनाकडे सरकारने गांभीर्याने पाहून त्वरित गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणीही पासलकर यांनी केली. मराठा आरक्षण हे न्यायप्रविष्ट असले तरी या मागणीबरोबरच सरकारने इतर 20 मागण्या मान्य कराव्यात यासाठी चक्री उपोषण सुरू करण्यात येणार आहे. औरंगाबाद येथे झालेल्या राज्य समन्वयकांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे. त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयासमोर हे चक्री उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये संख्येचे बंधन नाही; परंतु आगामी काळात पुन्हा हिंसक घटना घडू नयेत याचीही खबरदारी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे कोंढरे यांनी सांगितले.

औरंगाबाद तोडफोडीची सीआयडी चौकशी करा

वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान झालेल्या तोडफोडीचे तपासासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ ‘सीआयडी’ चौकशी आदेश द्यावेत, जेणेकरून ‘दूध का दूध..’ होईल, अशी आग्रही मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनानेही सखोल चौकशी करून लवकर अहवाल सादर करावा. अपप्रवृत्तीने केलेल्या गैरकृत्याचा मराठा क्रांती मोर्चातर्फे निषेध नोंदवला.