होमपेज › Pune › पंधरा वर्षांपेक्षा जुन्या वाहनांमुळे  प्रदूषणात वाढ

पंधरा वर्षांपेक्षा जुन्या वाहनांमुळे  प्रदूषणात वाढ

Published On: Jan 11 2018 1:12AM | Last Updated: Jan 10 2018 10:57PM

बुकमार्क करा
पुणे : अपर्णा बडे

आयुर्मान संपूनही मोठ्या प्रमाणात होणार्‍या वाहनांच्या वापरामुळे शहराच्या  प्रदूषणात वाढ झाली आहे; तसेच  एसटी, बस व ट्रकसारख्या मोठ्या वाहनांच्या नियमित देखभालीकडे दुर्लक्ष केले असल्यामुळेही प्रदूषणात भर पडत आहे. गाड्यांच्या इंजिनातून बाहेर पडणार्‍या धुरामध्ये घातक घटकांच्या तीव्रतेमुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागली आहे. अ‍ॅलर्जीमुळे होणारे आजार बळावत आहेत. आयुर्मान संपलेल्या वाहनातील इंधनाचे पूर्ण ज्वलन न झाल्यामुळे हवेत काबर्न मोनॉक्साइड आणि सल्फर डाय ऑक्साइडसारखे विषारी घटक मोठ्या प्रमाणात मिसळत असून, त्याचा मानवी आरोग्याला धोका वाढत असल्याच्चे पुण्यातील वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञ व मेकॅनिकल विभागातील जाणकारांचे म्हणणे आहे

पुणे शहरात गाड्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दुचाकीबरोबरच चारचाकी व अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवू लागल्या आहेत. एसटी, पीएमटीसह, अवजड वाहने, ट्रकमध्ये डिझेल इंजिनचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या वाहनांत 70 ते 150 अश्वशक्तीची  इंजिन्स वापरली जाते. आयुर्मान संपलेल्या व इंजिनची क्षमता कमी झाल्याने वाहनातून मोठ्या प्रमाणात धुराची निर्मिती होते, त्यामध्ये घातक घटक जास्त असतात असे मेकॅनिकल क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

‘भारत स्टेज फोर’चा अभाव

प्रवासी वाहतूक करणारी व्यवस्था, अवजड वाहतूक, ट्रक व्यावसायिकांकडून वाहनांच्या इंजिन देखभालीबाबत पुरेशी खबरदारी घेतली जात नाही; त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्याचप्रमाणे बहुतांश मोठ्या वाहनांतील इंजिन हे  ’भारत स्टेज थ्री’ बनावटीचे आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. जुने  इंजिन इंधन ज्वलनासाठी पुरेशा क्षमतेचे नाही . वाहनांमध्ये   ‘भारत स्टेज फोर’चा अभावही हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. एसटी, पीएमटी महामंडळाच्या जुन्या गाड्यांमधून दररोज बाहेर पडत आहेत.