Sun, Apr 21, 2019 05:41होमपेज › Pune › SCची बंदी असूनही दिवाळीत प्रदूषणात वाढ 

SCची बंदी असूनही दिवाळीत प्रदूषणात वाढ 

Published On: Nov 09 2018 7:27PM | Last Updated: Nov 10 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी

यंदा सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यास दोन तासांची मुदत दिली होती. त्याचा सकारात्मक परिणामही झाला असून फटाके विक्री व फोडण्याच्या संख्येतही घट नोंदविली गेली. यामुळे प्रत्यक्षात वायु प्रदूषण कमी होण्याची अपेक्षा असताना ते गेल्या वर्षीच्या तुलनेत पाडव्याच्या दिवशी (दि. ८) ला किंचित वाढल्याचे दिसून आले. तर इतर दिवशी ते गेल्यावर्षीच्या तुलनेत मात्र ब-याच प्रमाणात कमी आढळून आले. ‘सफर - इंडिया’ या संस्थेने केलेल्या चाचणीत ही माहिती आढळून आली आहे.

सफर संस्थेकडून पुण्यातील पाषाण, शिवाजीनगर, लोहगाव, आळंदी, कात्रज, हडपसर, भोसरी, निगडी, मांजरी आणि भुमकर चौक या दहा ठिकाणी ही चाचणी करण्यात आली. याद्वारे हा हवा प्रदूषणाचा अहवाल तयार करण्यात आला आहे.   

हवेतील प्रदूषण हे हवेत लिकनांचे प्रमाण किती आहे यावरून ठरवले जाते. साधारणतः हवेत दोन प्रकारचे धूलिकण असतात. दहा मायक्रोमीटर (पीएम १०) पेक्षा लहान आकारमानाचे धूलिकण आणि २.५ मायक्रोमीटर पेक्षा लहान आकारमानाचे (पीएम २.५)  यांना अतिसूक्ष्म धूलिकण असे म्हणतात. धुलिकण हे श्‍वसनामार्फत शरीरात जातात तर सूक्ष्म धुलिकण हे फुप्फुसात खोलवर जाउन ते तेथे दीर्घकाळ साचतात आणि नंतर रक्तामध्ये मिसळतात. या दोन्हींचेही शरीरावर विपरित परिणाम आढळून येतात.

‘सफर’द्वारे दिवाळीच्या (दि. ७ लक्ष्मीपुजन) दोन दिवस आधी आणि दोन दिवस नंतर असे पाच दिवस शहरातील हवेच्या प्रदुषणाचे निरीक्षण करण्यात आले. यावर्षी नेहमीप्रमाणेच लक्ष्मीपुजनाच्या दिवशी कमी तर दुस-या दिवशी  (दि. ८, पाडवा) अधिक प्रदुषण झाल्याचे आढळून आले आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत सूक्ष्म धुलिकणांची (पीएम २.५) पातळी केवळ पाडव्याला अत्युच्च म्हणजे १२७ (अतिशय प्रदूषित )इतकी  वाढल्याचे आढळून आले.

पाडव्याला सर्वाधिक प्रदुषण

गेल्यावर्षी पाडव्याला प्रदुषणाची पातळी  ११९ (पीएम २.५) इतकी होती. तर २०१६ ला ते प्रमाण १६८ (तीव्रप्रदुषित) होते. तसेच २०१६ ला या पाचही दिवसांत प्रदुषणाची पातळी २०१७ आणि २०१८ पेक्षा अत्युच्च होती. तर यावर्षी मात्र हवाप्रदुषणाची पातळी पाडवा वगळता इतर दिवशी गेल्यावर्षीच्या तुलनेत खूपच कमी असल्याचेही आढळून आलेले आहे. 

रात्री अकरा ते पाच सर्वाधिक प्रदुषण

लक्ष्मीपुजन (दि.७) आणि पाडवा (दि. ८) या दोन दिवशी धुलिकण आणि सुक्ष्म धुलिकणांचे प्रदूषण नोंदविले गेले. त्यामध्ये रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत सर्वाधिक प्रदूषणाची नोंद करण्यात आली. तर सहा तारखेपर्यंत वायुप्रदुषण पातळी सर्वसाधारण आणि चांगली होती. 

हडप्सर व मांजरी सर्वाधिक प्रदुषित

शहर आणि उपनगरांमध्ये एकूण दहा ठिकाणी वायुप्रदुषणाची चाचणी करण्यात आली असता त्यामध्ये हडपसर आणि मांजरी येथे सर्वाधिक हवा प्रदूषित असल्याचे निरीक्षण ‘सफर’ ने नोंदवले आहे.