Mon, Sep 16, 2019 12:19होमपेज › Pune › महामार्गाचे राजकारण, नेत्यांची चमकोगिरी

महामार्गाचे राजकारण, नेत्यांची चमकोगिरी

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 12:43AMसुहास जगताप

पुणे-सातारा महामार्गाच्या दुरवस्थेचे राजकारण सुरू असतानाच आता पुणे-नाशिक महामार्गाचे राजकारण सुरू झाले असल्याने प्रवाशांच्या यातना आणि भूसंपादन झालेल्या शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटणार का? हा मोठा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अतुल बेनके आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे या दोघांनीही चाळकवाडी टोल नाका बंदचे आंदोलन पुकारले आहे. बेनके यांनी प्रथम आंदोलनाची घोषणा करताच सोनवणे यांनी कुरघोडी करण्यासाठी त्यापूर्वीच नाका बंद करून टाकला, त्यानंतर बेनके यांनीही नाका बंद केला. यामध्ये राजकीय कुरघोडीशिवाय काही साध्य झाले असे वाटत नाही, आता या प्रश्‍नावर राजकारणाशिवाय काही होईल असे वाटत नाही. 

नाशिक महामार्गाचे अनेक प्रश्‍न लटकले

या महामार्गावर मोठा टोल भरूनही प्रवासी आणि स्थानिक लोकांसाठी हा मार्ग डोकेदुखी ठरला आहे. तीन बाह्यवळण रस्ते केलेले नाहीत. तयार केलेल्या मार्गावर अनेक समस्या आहेत. अनेक अडथळे, अडचणी यांचा सामना करत प्रवास करावा लागतो आणि भरपूर वेळ, इंधन खर्च केल्यावर वर टोल भरावा लागतो हे वेगळे! हे झाले प्रवाशांचे हाल महामार्ग तयार करण्यासाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांचेही अनेक प्रश्न आहेत. अनेकांच्या जमिनींच्या नीट मोजणी झालेल्या नाहीत. पैसे मिळालेले नाहीत. शेतकर्‍यांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात शंभरहून जास्त किलोमीटर प्रवास करून पुण्यात यावे लागते. स्थानिक पातळीवर त्यांचे प्रश्न सोडविणारे कोणीही नाही, असे अनेक प्रश्न या महामार्गामुळे निर्माण झाले आहेत.

राजकीय नेतृत्वाने हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असताना कोणीही कंपनीला अपुरी कामे, प्राधिकरणाला भूसंपादन आणि इतर प्रश्न याबाबत खडसावून विचारायला तयार नाही. प्रश्न असा पडतो की, खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी, पोलिस, स्थानिक नेते अशा सर्वांना या महामार्गावरून जाणारे प्रवासी तसेच ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत ते शेतकरी काय यातना भोगत आहेत ते दिसत आहे. परंतु कोणीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. पुणे-नाशिक महामार्ग रेंगाळला आहे. टोल मात्र धडाक्यात चालू आहे. पुणे-सातारा महामार्गाचे रुंदीकरण जसे अनेक वर्षांपासून रखडले आहे आणि टोल सुरू आहे, तशीच अवस्था नाशिक महामार्गाची होण्याची शक्यता आहे.

सातारा महामार्गही रखडला

सातारा महामार्गाच्या सहापदरीकरणाचे कामही असेच दहा वर्षांपासून रखडले आहे. सहापदरीकरणाचा टोल मात्र बिनधास्त सुरू आहे. लोकप्रतिनिधी लुटुपुटूची आंदोलने करण्यात राजकीय फायदा मिळविण्यात धन्यता मानतात. प्रवासी, जनतेचे हाल मात्र सुरू आहेत. काम अपूर्ण असल्याने आत्तापर्यंत शेकडो लोकांचे प्राण गेले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी ही कंपनीला दरडवण्यापलीकडे काही केले नाही. रस्ता बनविणारी कंपनी या भागातील खासदार, दोन-तीन आमदार, मंत्री यांना मात्र काही देणे-घेणे नसल्यासारखी स्थिती आहे. चौपदरीकरण पूर्ण न होताच खेडशिवापूर टोल चालू केला. अद्यापही चौपदरीकरण सुविधा दिलेल्या नाहीच. त्यातच सहा पदरीकरणाचे कामही सुरू करण्यात आले आणि लगेच सहा पदरीकरणाचा टोलही गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये आकारला जात आहे; परंतु, काम अद्यापही सुरूच आहे.

‘पीएमआरडी’ची आरक्षणे डोक्यावर

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील गावांमध्ये निरनिराळ्या प्रकारची 16 आरक्षणे पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मावळ, मुळशी, दौंड, पुरंदर, हवेली, भोर या तालुक्यांत पीएमआरडीची हद्द आहे. यामुळे या भागातील जमीन मालकांवर मोठेच संकट आल्याने त्यांच्यात गोंधळाची स्थिती आहे. नागरी सुविधांसाठी जमिनी आरक्षित कराव्या लागणार हे निश्‍चित असले तरी या हद्दीत बहुसंख्य शेतजमिनी आहेत. गावठाणे पूर्णपणे भरलेली आहेत. अशा वेळी आपल्या शेतजमिनींवर आरक्षण पडणार का? अशा शंकेने ग्रामीण भागात चर्चा सुरू झाली आहे. तालुकानिहाय बैठका घेऊन पीएमआरडीचे अधिकारी बांधकाम नियमावली आणि आरक्षणे याबाबत माहिती देत आहेत.