Mon, Sep 16, 2019 05:29होमपेज › Pune › हर्डीकर जिल्हाधिकारी तर राव मनपा आयुक्‍तपदी?

हर्डीकर जिल्हाधिकारी तर राव मनपा आयुक्‍तपदी?

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 10 2018 1:14AMपुणे : दिगंबर दराडे

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त असलेले श्रावण हर्डिकर यांची जिल्हाधिकारी तर सध्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महानगरपालिकेच्या आयुक्‍तपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. 

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्रात बदली झाली आहे. कुणाल कुमार यांच्या रिकाम्या झालेल्या पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी लवकरच पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात सुरु आहे. येत्या दोन ते तीन दिवसात बदल्यांचे आदेश येतील अशी चर्चा आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्‍तपदी असलेल्या श्रावण हर्डिकर यांच्या नावाची मागणी जिल्हाधिकारी पदाकरिता वरिष्ठ मंंत्र्याकडून करण्यात येत असल्याने नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सौरभ राव यांचा जिल्हाधिकारी पदावरील प्रशासकीय कार्यकाळ एक वर्षांपूर्वीच पूर्ण झाला आहे. तर श्रावण हर्डीकर यांना पिंपरी चिंचवड महापालिकेत एक वर्षे झाले आहे.  

आता प्रशासकीय बदल्याचा हंगाम सुरु झाल्याने दोघांच्या बदल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यात कुणाल कुमार यांना पदोन्नती देऊन त्यांची केंद्रात बदली करण्यात आली. अधिवेशन सुरु असल्याने शासनाकडून पदमुक्तीचे आदेश न आल्याने कुणाल कुमार यांनी महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार सोडला नव्हता. दरम्यान, चंद्रकांत दळवी निवृत्त झाल्याने विभागीय आयुक्तपद रिक्त झाले असून, जिल्हाधिकारी पद देखील रिक्त होणार आहे. यामुळे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर कोण येणार यांची चर्चा सुरु आहे. यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही पदांवर आपल्या विश्वासातील व्यक्तींची नियुक्ती करणार असल्याची चर्चा आहे.

विभागीय आयुक्‍तपदासाठी  गायकवाड, पाटील, भोसलेंची नावे चर्चेत

पुणे विभागीय आयुक्‍तपदाकरिता सध्या भूजल सर्वेक्षण व विकासचे संचालक शेखर गायकवाड, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि जगदीश पाटील यांची नावे चर्चेत आली आहेत. शेखर गायकवाड यांच्या नावाला पुणे विभागीय आयुक्‍तपदासाठी अधिकची पंसती असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी ‘पुढारी बरोबर बोलताना सांगितले. 

 

Tags : pune, pune news, Hardikar District Collector, Rao commissioner, may be appointed,