Tue, Jan 22, 2019 07:55होमपेज › Pune › गुड न्यूज;देशात यंदादेखील उत्तम पाऊसमान

गुड न्यूज;देशात यंदादेखील उत्तम पाऊसमान

Published On: Apr 16 2018 5:07PM | Last Updated: Apr 16 2018 5:08PMपुणे: प्रतिनिधी 

स्कायमेट पाठोपाठ भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) देखील देशातील नागरिकांना गुड न्यूज दिली आहे. गतवर्षीच्या दमदार पावसापाठोपाठ यंदाच्या वर्षी देखील देशभर उत्तम पाऊसमान राहणार असल्याचा पहिला अंदाज आयएमडीने सोमवारी (दि. 16) वर्तविला आहे. देशात यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस बरसणार असून राज्यातही समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे भाकीत आयएमडीच्या वतीने वर्तविण्यात आले आहे. मराठवाडा, विदर्भाच्या दुष्काळी टप्प्यात देखील वरुणराजा प्रसन्न होणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे बळीराजा चांगलाच सुखावणार आहे. 

जून ते सप्टेंबर हा नैर्ऋत्य मोसमी पावसाचा (मान्सून) काळ म्हणून ओळखला जातो. यंदाच्या वर्षी या चार महिन्यांपैकी काही दिवस पावसात मोठा खंडही पडेल, असेही नमूद करण्यात आले आहे. आयएमडीचा दुसरा अंदाज जून महिन्यात वर्तविण्यात येणार असून तो आणखी अचूक असेल, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. एप्रिल महिन्यातील अंदाज प्राथमिक पातळीवर असून पुढील दोन महिन्यांमध्ये हवामानात झपाट्याने बदल होणार आहे. जूनमधील अंदाजात राज्यातील कोणत्या भागात अतिवृष्टी होईल, याचा तपशीलवार अंदाज देखील मिळू शकतो.    

सरासरी पाऊस म्हणजे किती?

890 मि.मी पाऊस सरासरी मानला जातो. त्याच्या 19 टक्के कमी-अधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतकाच मानला जातो. 2017 मध्ये 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र 95 टक्के पाऊस पडला. तर 2016 मध्ये सरासरीच्या 106 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज आयएमडीने वर्तविला होता. प्रत्यक्षात 97 टक्केच पाऊस पडला. 2014 आणि 2015 ही दोन्ही वर्ष राज्यासाठी दुष्काळसदृश ठरली होती. मराठवाड्यात पावसाअभावी भीषण स्थिती निर्माण झाली होती. 
 

Tags : Farmers, IMD, 2018, Mansoon, Rainfall