Mon, Jun 17, 2019 10:07होमपेज › Pune › अखेर बीडच्या 'जय महेश' कारखान्याकडून शेतकऱ्यांना न्याय

अखेर बीडच्या 'जय महेश' कारखान्याकडून शेतकऱ्यांना न्याय

Published On: Oct 12 2018 4:18PM | Last Updated: Oct 12 2018 4:18PMपुणे : पुढारी ऑनलाईन 

शेतकऱ्यांना जय महेश साखर कारखान्याकडून हंगाम २०१७ - १८ मधील उसाच्या थकीत एफआरपीची रक्कम मिळाली नव्हती. ती थकीत रक्कम मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. शेतकऱ्यांनी थकीत एफआरपीची रक्कम मिळविण्यासाठी साखर संकुलाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या पुढाकाराने 'झोपडी निवास आंदोलन केले. हे आंदोलन तीन दिवसांपासून सुरु होते.

या आंदोलनाला यश आले आहे. साखर आयुक्त आणि जय महेश कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संबंधित शेतकऱ्यांच्या येत्या १८ ऑक्टोबरला पूर्ण थकीत रक्कम देण्यात येणार असल्याची लेखी हमी जय महेश कारखान्याने शुक्रवारी (दि.१२) दिली. शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करुन केलेत शिष्टाई यशस्वी झाली आहे.  

सुमारे १५० हुन अधिक शेतकरी कुटुंबीय येथील साखर संकुलासमोर झोपडी निवास हे अभिनव आंदोलन करत आहेत. शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व माजलगाव शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनाला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले.  या दोन दिवशीही चर्चेनंतर आज पिडीत शेतकरी, शिवसेना पदाधिकारी व साखर आयुक्त यांच्यात समाधानकारक चर्चा होवून योग्य तोडगा निघाला. शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी योग्य शिष्टाई करुन शेतकऱ्यांच्या वतीने आपली प्रभावी बाजू मांडली. साखर आयुक्त आणि आंदोलक यांच्यात झालेल्या शिष्टाईनंतर जय महेश साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीष लोखंडे यांनी या प्रश्नी रक्कम देण्याची लेखी हमी पत्राद्वारे दिली आहे.

जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने गिरीष लोखंडे यांनी दिलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, येत्या १८ ऑक्टोबर रोजी पिडीत शेतकऱ्यांची थकीत ऊसाची बीले देण्यात येतील. अनेक महिने या पिडीत शेतकऱ्यांनी वेळोवेळी लोकशाही मार्गाने विविध आंदोलने केली सरकारी दरबारी थेटे घालून या प्रश्नी पाठपुरावा केला तरीही कुठलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे माजलगाव तालुक्यातील या पिडीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानूसार आंदोलनाची दिशा ठरली आणि पुण्यातील साखर संकुलासमोर गेल्या तीन दिवसांपासून तब्बल ३०० पिडीत कुटुंबांनी मुलांबाळासह झोपडी निवास आंदोलन सुरु करुन या प्रश्नी सरकारचे लक्ष वेधून घेतले. याप्रश्नी साखर आयुक्त आणि निलम गोरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर जय महेश साखर कारखान्याने ऊसाची बीले शेतकऱ्यांना देण्याची लेखी हमी दिली. 

...तर रस्त्यावर उतरु... 

या प्रश्नी लढा उभारणारे आप्पासाहेब जाधव यांनी सांगितले की, पिडीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण यापुढेही कार्यरत राहणार. शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम म्हणून जय महेश कारखान्याला झूकावे लागले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेवून थकीत सर्व बीले दिनांक १८ ऑक्टोबर पर्यंत देण्याचे कारखान्याने मान्य केल्याने शिवसेनेच्या आंदोलनास यश मिळाले आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना त्यांची थकीत ऊस बीले मिळत आहेत याचे मला समाधान वाटते. सध्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असले तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरु असा इशारा जाधव यांनी दिला आहे.

साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी योग्य शिष्टाई केल्याबद्दल शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ.नीलम गोऱ्हे, बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व अप्पासाहेब जाधव यांनी आभार मानले. या शिष्टमंडळात राजश्री जाधव, सिता शेंडगे, मुंजाबा जाधव, रत्नाकर कदम, माऊली शेंद्रे, मच्छिंद्र शिंदे, गोविंद शेंडगे आदींची उपस्थिती होती. तसेच या आंदोलनात संजय महाद्वार, सुशिल पिंगळे, रामराजे सोळंके, बाळासाहेब मेंडके, दासु बादाडे, संदीप माने, मुंजाबा जाधव, रत्नाकर कदम, लक्ष्मण सोळंके, रामदास ढगे, फारुक सय्यद, महादेव लंगडे, रामेश्वर काशिद, कचरु बढे, बळीराम भले, राहुल कोल्हे, ज्ञानेश्वर खराडे, विजय नाईकनवरे आदिंनी साखर आयुक्त व जय महेश साखर कारखान्याने दिलेल्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.