Sat, Aug 24, 2019 10:12होमपेज › Pune › विद्यार्थ्यांना नापास करून डोनेशनचा बाजार!

विद्यार्थ्यांना नापास करून डोनेशनचा बाजार!

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 12:52AMभवानीपेठ : मोहिनी मोहिते

तुमचा मुलगा नापास झाला आहे.. ही घ्या गुणपत्रिका... त्याला पुन्हा प्रवेश घ्यायचा असल्यास डोनेशन द्या, अन्यथा पास झाल्याची गुणपत्रिका देतो, ती घेऊन दुसर्‍या शाळेचा रस्ता धरा...! हंचिग्स हायस्कूल या नामांकित इंग्रजी शाळेने विद्येच्या माहेरघरात हा उघडपणे मांडलेला बाजार पाहून पालकांना जबरदस्त धक्काच बसला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गुणपत्रिका पालकांना देण्यात आल्या असून, या शाळेवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत नापास करताच येऊ शकत नाही. मात्र ही शाळा आदेश धाब्यावर बसवून मनमानी कारभार करीत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्याचबरोबर पालकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.दरम्यान, याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका रिटा कटावती यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

डोनेशनमध्येही गोलमाल?

लाखो रुपयांचे डोनेशन शाळेच्या नावाने न घेता लेखनिक व कर्मचारी यांचे नावे व्यक्तिगत डी. डी. किंवा धनादेश भरून घेतला जात असल्याचे सांगण्यात आले. पैसे भरण्यास विलंब झाल्यास दंड म्हणून जादा पैसे  आकारले जात असल्याची तक्रारही पालकांनी केली. या प्रकाराची चौकशी करून शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी पालकांनी केली आहे. 

अपमानास्पद वागणूक..

मुख्याध्यापिका भेट घेत नाहीत, आमचे म्हणणे ऐकत नाहीत, डोनेशन द्या अथवा घरी जा, असे सांगतात, अशी पालकांची तक्रार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकांची काही मुले अभ्यासात हुशार आहेत, पण आर्थिक क्षमता नसल्याने या शाळेत शिकण्याची तुमची लायकी नाही, आश्रमशाळेत जा, असे बोलून मुख्याध्यापिका अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी काही पालकांनी केल्या.