Mon, Nov 20, 2017 17:23होमपेज › Pune › प्रतिनियुक्तीवरील अधिकार्‍यांना मुदतवाढ देण्याच्या हालचाली

प्रतिनियुक्तीवरील अधिकार्‍यांना मुदतवाढ देण्याच्या हालचाली

Published On: Nov 15 2017 2:51AM | Last Updated: Nov 15 2017 2:48AM

बुकमार्क करा


पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत शासन प्रतिनियुक्‍तीवर आलेल्या काही अधिकार्‍यांवर सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्‍यांची चांगलीच मेहेरनजर दिसत आहे. महापालिकेत तीन वर्षे मुदत संपूनही तीन अधिकार्‍यांची अद्याप बदली झालेली नाही. उलट त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देऊन अभय देण्याचा हालचाली सुरू आहेत. 

शासन निर्णयानुसार महापालिका कामकाजात 11 सहायक आयुक्‍तांची नेमणूक करण्यात येते. त्यात 6 शासनाने दिलेले प्रतिनियुक्‍ती अधिकारी आणि 5 महापालिकेचे अधिकारी अशा नेमणुका करण्यात येतात. त्यानुसार शासन नियुक्‍तीवर आलेले अधिकार्‍यांचा कार्यकाळ किमान 3 वर्षांचा असतो. तीन वर्षांची मुदत संपल्यानंतर त्या अधिकार्‍यांची तत्काळ अन्यत्र बदली करण्यात येते. त्यानुसार महापालिकेतील निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने, आरोग्य कार्यकारी अधिकारी मिनीनाथ दंडवते, नागरवस्ती विभागाचे प्रशांत खांडकेकर यांच्या विहित मुदतीत बदल्या झालेल्या आहेत, तर अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची साडेचार महिन्यांच्या आतच तडाफडकी नुकतीच बदली केली गेली. 

मात्र, महापालिकेत शासन प्रतिनियुक्‍तीवर आलेल्या प्रशासन विभागाचे सहायक आयुक्‍त डॉ. महेशकुमार डोईफोडे, आकाशचिन्ह व परवाना विभागाचे सहायक आयुक्‍त योगेश कडूसकर, मुख्य लेखा परीक्षक पद्यश्री तळदेकर यांनी सत्ताधारी पदाधिकार्‍यांशी जुळवून घेतल्याने या तीन अधिकार्‍यांवर सत्ताधार्‍यांची मेहेरनजर आहे. या अधिकार्‍यांना महापालिका प्रशासनाने एक वर्ष अजून मुदतवाढ देण्याच्या हालचाली सुरू आहेत. ही मुदतवाढ पदाधिकार्‍यांच्या सांगण्यावरून देण्यात येत आहे. 

दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त तानाजी शिंदे यांची देखील बदली विहित मुदतीत झालेली आहे. त्यांच्या जागेवर आलेल्या अच्युत हांगे यांनी नियमावर बोट दाखवून कामकाजाला सुरुवात केली. यामुळे काही सत्ताधारी पदाधिकार्‍यांशी त्यांचे वाद झाले. त्यामुळे त्यांची अचानक बदली झाली. विरोधात गेलेल्या अधिकार्‍यांची बदली तर जुळवून घेणार्‍या अधिकार्‍यांना मुदतवाढ देण्याची नवी ‘पारदर्शक’ प्रथा महापालिकेत सुरू आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.