Sat, Jun 06, 2020 12:27होमपेज › Pune › पतीची परवानगी न घेता केलेला गर्भपात ही क्रूरता

पतीची परवानगी न घेता केलेला गर्भपात ही क्रूरता

Published On: May 17 2019 1:46AM | Last Updated: May 17 2019 1:59AM
पुणे : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पतीच्या परवानगीशिवाय परस्पर गर्भपात करून घेतल्याप्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला दणका दिला आहे. वैवाहिक आयुष्यात मूल होऊ देणे, हा पती-पत्नी दोघांचा निर्णय असतो. मात्र, पतीची परवानगी न घेता केलेला गर्भपात ही क्रूरता असल्याचा निर्वाळा देत कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे यांनी पतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज मान्य केला आहे. 

या प्रकरणी पती अशोक (वय 32, नाव बदललेले) यांनी पत्नी आशा (वय 27, नाव बदललेले) विरुद्ध घटस्फोटाचा दावा अ‍ॅड. संग्रामसिंह देसाई यांच्यामार्फत दाखल केला होता. डिसेंबर 2011 मध्ये अर्जदाराचा विवाह झाला होता. पतीने सुखी जीवनाची स्वप्ने रंगवली होती. त्यातच अशोकला एक महिन्यानंतर आशा गर्भवती असल्याची आनंदाची बातमी समजली; मात्र तिला मूल नको होते. ‘नवीन कार घेतली नाही, तर गर्भपात करीन’ अशी धमकी तिने दिली. लग्नाच्या चौथ्या महिन्यातच अशोकने तिची इच्छा पूर्ण करून कारही घेतली. घरात आनंदाचे वातावरण असताना अशोक काही कामानिमित्त बाहेरगावी गेला असताना आशाने पाच महिन्यांची गर्भवती असताना पतीला कोणतीही कल्पना न देता गर्भपात करून घेतला. रुग्णालयाने दिलेल्या प्रमाणपत्रामध्ये गर्भात कोणताही दोष नसल्याचे म्हटले होते. अशोकच्या म्हणण्यानुसार तिने गर्भपात करून मुलीची हत्या केली. मुलगा हवा असल्याच्या हट्टातून तिने घरच्या लोकांच्या मदतीने हे कृत्य केले. या प्रकरणी अर्जदार पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पत्नीने त्याच्याविरुद्ध विविध ठिकाणी तक्रार केल्यामुळे त्याला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. तिच्या या वागण्यामुळे त्याला मानसिक त्रास झाला. मे 2012 मध्ये तिने गर्भपात केला. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अ‍ॅक्ट 1971 नुसार संबंधितांविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांपुढे या प्रकरणावर फौजदारी सुनावणी सुरू असल्याचे याचिकाकर्त्याने सांगितले. एक वर्ष वेगळे राहिल्यानंतर पत्नीने पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार होत असल्याची तक्रार केली होती. 

छळाचे कारण सांगूनही गर्भपात अयोग्यच 

अर्जदार पतीने आणि त्याच्या नातेवाइकांनी तिला पाच वेळा मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तिच्याकडून करण्यात आला होता. मात्र, या आरोपात तथ्य असल्याचा कोणताही पुरावा नाही. गर्भामध्ये काही दोष असेल तर गर्भपात करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये तसा सल्ला देण्यात आलेला नव्हता. गर्भाची वाढ चांगली होती. सासरच्या लोकांकडून छळ झाल्याचे कारण सांगून गर्भपात करून घेण्यात आला. सासरच्या लोकांनी छळ केला म्हणून अशाप्रकारे गर्भपात करणे योग्य नसते. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांमध्येही हे स्पष्ट करण्यात आले आहे, असे न्यायाधीशांनी या निकालात नमूद केले आहे.