होमपेज › Pune › बदनामीप्रकरणी तृप्ती देसाईंवर कोटीचा दावा

बदनामीप्रकरणी तृप्ती देसाईंवर कोटीचा दावा

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 13 2018 12:49AMपुणे : प्रतिनिधी

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे आरोप करत तोंडाला काळे फासणार असल्याचे जाहीर वक्तव्य केले होते. याप्रकारे बदनामी केल्याप्रकरणी डॉ. चंनदनवाले यांनी भूमाता ब्र्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यावर गुरूवारी पुणे न्यायालयात एक कोटी रुपयांचा दावा दाखल केला. तसेच बंडगार्डन पोलिसांनी देसाई यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेऊन समज दिली आहे. 

गेल्या आठवडयात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये देसाई यांनी डॉ. चंदनवाले यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र बोगस आहे. या प्रमाणपत्रावर ते बेकायदेशीरपणे सात वर्षे ससूनच्या अधिष्ठातापदावर आहेत. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून   त्यांची हकालपटटी करावी. जर तसे झाले नाही तर भूमाता ब्रिगेड त्यांच्या कार्यालयात घूसून त्यांना काळे फासेल असे जाहीर विधान केले होते.

अपंगत्वाचे प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने आणि मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाने ग्राहय धरल्याचे पुरावे डॉ. चंदनवाले  यांच्याकडे आहेत. त्यामुळे  त्यांनी गुरूवारी पुणे न्यायालयात तृप्ती देसाई यांच्याविरुध्द एक कोटी रुपयांचा दावा दाखल केला असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच बंडगार्डन पोलिस ठाण्यातही देसाई यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करावी म्हणून तक्रार अर्ज दिला आहे. याची माहिती वैद्यकिय शिक्षण विभाग संचालक आणि सचिव यांना देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

देसाई यांना पोलिसांकडून समज

डॉ. चंदनवाले यांनी यासंदर्भात तृप्ती देसाई यांच्याविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाची दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तृप्ती देसाई यांना समज देउन सोडण्यात आले आहे, अशी माहिती बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. एम. मुजावर यांनी दिली. 

रुग्णालयाला छावणीचे स्वरूप

डॉ. चंदनवाले हे सात दिवसांत पदावरून दुर झाले नाही तर भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना काळे फासण्यात येईल असे विधान तृप्ती  देसाई यांनी केले होते. या पार्श्‍वभूमीवर बी.जे वैद्यकिय महाविद्यालय आणि अधिष्ठाता कार्यालय येथे अतिरिक्त सूरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान एका संघटनेने बी.जे. महाविद्यालयाच्या गेटवर आज डॉ. चंदनवाले यांच्या विरोधात आंदोलन केले होते. तेव्हा पोलिसांनादेखील पाचारण करण्यात आले होते.