Tue, Jul 14, 2020 00:08होमपेज › Pune › वनाज ते रामवाडी ‘मेट्रो’ चे बांधकाम संथगतीने सुरू

वनाज ते रामवाडी ‘मेट्रो’ चे बांधकाम संथगतीने सुरू

Published On: Mar 14 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 12:05AMपुणे : ज्योती भालेराव-बनकर

मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला मे 2017 ला सुरुवात झाली होती. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट  या मार्गिका क्रमांक 1 च्या कामानंतर काही महिन्यांच्या अंतराने वनाज ते रामवाडी या मार्गिका क्रमांक 2 च्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, जितक्या कालावधीत पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गाच्या  बांधकामाची प्रगती करणे महामेट्रोला साध्य झालेले आहे, त्या तुलनेत वनाज ते रामवाडी या मार्गिका क्रमांक 2 च्या कामाची गती संथ असल्याचे दिसून येत आहे. 

सध्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर आत्तापर्यंत 88 खांबांसाठी ठोस पाया तयार करण्यात आलेला आहे; तसेच 50 खांब उभारण्यात आलेले आहे, तर 20 खांबांचे पिलर कॅप काँक्रिटींग पूर्ण झाले आहेत. सध्या या मार्गावरील मेट्रो स्टेशनच्या कामालाही सुरुवात झाली आहे. एकूण नऊ मेट्रो स्टेशन या मार्गावर असणार आहेत. त्यातील सर्व ठिकाणच्या माती परीक्षणाचे काम पूर्ण झाले असून, हे काम अलफारा जेव्ही या कंपनीला देण्यात आलेले आहे. संत तुकारामनगर, फुगेवाडी, बोपोडी स्टेशन या ठिकाणी पायासाठी लागणार्‍या फाउंडेशनचे कामही सुरू करण्यात आलेले आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स यादरम्यानच्या व्हाया डक्ट उभारणीचे कामही जोमाने सुरू आहे. 

वनाज ते रामवाडी या मार्गादरम्यान जिओ टेक्निकलरीत्या माती परीक्षण सुमारे 198 ठिकाणी पूर्ण करण्यात आले आहे. पायासाठी लागणारे खोदकाम 36 ठिकाणी पूर्ण झाले आहे, तर 17 ठिकाणी फुटिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे; मात्र आत्तापर्यंत फक्त एकाच ठिकाणी खांब उभारणी पूर्ण झाली आहे. याशिवाय नदीपात्रातही चार ते पाच ठिकाणी खांब उभारणी, पाया खोदाई अशा अनेक प्रकारची कामे सुरू असली तरी मार्गिका क्रमांक 1 च्या तुलनेत ही बांधकामाची गती बरीच संथ आहे. 

वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम सुरू करताना अनेक ठिकाणच्या वाहतूक कोंडीच्या समस्या आणि वनाज डेपोसाठी लागणारी जागा हस्तगत करण्याविषयीचे प्रश्‍न होते. वनाज ते रामवाडी मार्गातील महत्त्वाचा भाग असणार्‍या कर्वेनगर रस्त्यावरील कामाची अजून सुरुवातही करण्यात आलेली नाही. कर्वे नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेले बदल, बसथांब्यांचे स्थलांतर, फुटपाथचे करावे लागणारे रुंदीकरण या सगळ्यासाठी लागणार्‍या परवानग्या यातही बराच वेळ जात असल्याचे दिसून येत आहे. हे दोन्ही मार्गांवरील मेट्रो 2021 
पर्यंत नागरिकांसाठी खुले करायचे असल्यास दोन्ही मार्गावरील बांधकामाच्या वेगातील तफावतीचा विचार महामेट्रोला करणे आवश्यक असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.