Mon, Jul 13, 2020 07:17होमपेज › Pune › आयुक्‍त हर्डीकर विरोधकांच्या रडारवर

आयुक्‍त हर्डीकर विरोधकांच्या रडारवर

Published On: Sep 07 2018 1:05AM | Last Updated: Sep 06 2018 11:31PMपिंपरी :  नंदकुमार सातुर्डेकर

‘नागपूर कनेक्शन’मुळे आधीच विरोधकांच्या ‘रडार’वर असलेले महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांचे सत्ताधारी व विरोधकांच्या वादात ‘सॅण्डविच’ झाले आहे. त्यामुळे ते  चिडचिडे झाल्याचे दिसत आहेत. पालिकेच्या ‘स्मार्ट सिटी’ कंपनीच्या शहर सल्लागार समिती बैठकीत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी त्यांनी साने यांचे अज्ञान काढले, तर मूळचे आक्रमक असलेल्या साने यांनी आयुक्तांना उद्देशून ‘आम्ही पालिकेचे विश्वस्त आहोत, तुम्ही पगारी नोकर आहात, लायकीप्रमाणे राहा,’ या शब्दांत त्यांना सुनावले. त्याच्या दुसर्‍या दिवशी झालेल्या शहर विकास व शहर परिवर्तन आराखडा या विषयावरील चर्चासत्रास गटनेतेच काय, पण महापौरांनाही निमंत्रण न दिल्याने त्यांना विरोधकांनी पुन्हा लक्ष्य केले.

स्मार्ट  समिती सल्लागार समितीची  बैठक  शुक्रवारी  खासदार, आमदार, महापौर, आयुक्त, पालिका पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत झाली. स्मार्ट सिटीअंतर्गत कासारवाडी आणि सेक्टर 23 येथे प्रायोगिक तत्त्वावर सोलर सिस्टीमचा प्रकल्प राबविला जाणार आहे. केंद्र सरकारची कंपनी याचा खर्च करणार आहे. या कंपनीने निर्मित केलेली वीज महापालिका प्रति युनिट साडेतीन रुपये या दराने विकत घेणार आहे. तर, महापालिका कचरा व राडारोड्यापासून तयार होणारी वीज साडेसहा प्रति युनिट दराने विकत आहे. याला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आक्षेप घेतला.

त्यावर आयुक्त  हर्डीकर यांनी हे दोन्ही विषय वेगळे आहेत, अज्ञानातून  काही बोलू नका, असे सुनावले. त्यामुळे   साने संतापले. त्यांनी आयुक्तांवर हल्लाबोल केला. ‘मी सज्ञान आहे. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. 15 वर्षांपासून मी जनतेतून निवडून येत आहे. तुम्ही नोकर असून, आम्ही विश्वस्त आहोत, याची जाण ठेवा, असे त्यांनी सुनावले. पत्रकारांशी बोलताना साने यांनी अडचणीचे प्रश्न विचारल्यावर आयुक्त ‘व्हायबल’ होतात. नगरसेवकांशी चढ्या आवाजाने बोलतात. विरोधी पक्षनेत्याशी ते असे बोलत असतील, तर बाकीच्या नगरसेवकांशी कसे बोलत असतील, असा प्रश्‍न करत हर्डीकर हे भाजपचे प्रवक्‍ते बनल्याची टीका केली.

दुसर्‍याच दिवशी झालेल्या शहर विकास व शहर परिवर्तन आराखडा या विषयावरील चर्चासत्रास गटनेतेच काय, पण महापौरांनाही निमंत्रण न दिल्याने आयुक्त वादाच्या भोवर्‍यात सापडले. बैठकीस निमंत्रण न दिल्याबद्दल विरोधी पक्षनेते दत्ता साने, सेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी संताप व्यक्त केला; मात्र महापौर राहुल जाधव यांनी ‘त्यांची रंगीत तालीम सुरू असेल, नंतर ते मला 
बोलावतील असे सांगत आयुक्तांची पाठराखण केली. या बैठकीत आयुक्तांनी पुण्याशी नेहमी तुलना केली जाते, मात्र भारतात पुण्यापेक्षा चांगली शहरे आहेत. भारतात काय चांगले चालले आहे, ते पाहून पिंपरी-चिंचवडला 2030 पर्यंत भारतातील  प्रगत व राहण्यायोग्य शहर करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. 

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी भाषणबाजीबद्दल आयुक्तांवर टीकास्त्र सोडले. शहर परिवर्तन आराखडा चर्चासत्रात त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचना विचारात घेणे अपेक्षित असताना आयुक्त स्वतःच भाषण ठोकत बसले. ते सल्लागारांचे प्रवक्ते झाल्याने भाजपला  कामच उरले नाही. आयुक्त हर्डीकर हे पंतप्रधान  मोदी यांच्याप्रमाणे 2020-2030 अशी भाषा करून गाजर वाटप करत आहेत, असा टोला कलाटे यांनी हाणला. साने यांनी चांगल्या कार्यक्रमास मला बोलवायचे नाही असे आयुक्तांनी ठरवलेले दिसते, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. एकूणच आयुक्त त्यांच्या कार्यपद्धतीमुळे वादग्रस्त बनले आहेत. 

शिवसेनेचे शिष्टमंडळ अ‍ॅटो क्‍लस्टर येथे आयुक्‍तांना निवेदन देण्यासाठी गेले, तेव्हा आयुक्‍तांनी माजी नगरसेवक मारुती भापकर यांना तुम्ही नेहमी माझ्याबद्दल बोलता, मी भ्रष्टाचार केला असे म्हणता, माझ्या घरी चला व मी पैसे कुठे ठेवलेत ते दाखवा, असे विधान केले. पालिका स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे हे आयुक्तांच्या भेटीस गेले असता हर्डीकर यांनी त्यांना ताटकळत ठेवले. आपण समोरच्या व्यक्तीला सन्मान दिला, तर ती व्यक्ती आपल्याला सन्मान देते हा  नियम आहे. मग लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांची तसेच माजी पदाधिकारी, नगरसेवकांची सन्मानाची अपेक्षा चुकीची कशी असेल, याचे भान आयुक्त  हर्डीकर यांनी ठेवायला हवे.