Fri, Sep 20, 2019 21:30होमपेज › Pune › फक्त नागरिकांनाच दिसतात अवैध धंदे!

फक्त नागरिकांनाच दिसतात अवैध धंदे!

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 25 2018 12:21AMपुणे : अक्षय फाटक

नव्या पोलिस आयुक्तांनी पदभार घेतल्यानंतर लागलीच पुणेकरांना सुरक्षितता देण्याचा आणि वाढता स्ट्रीट क्राईम रोखण्यासोबत अवैध धंद्यांना लगाम घालण्याचा निर्धार केला. त्यानुसार पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. सोबतच बेकायदा चालणारे धंदे आढळल्यात तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही शहरवासियांना केले. चांगल्या कल्पनांना उचलून धरणारे, भरभरून प्रतिसाद देणार्‍या पुणेकरांनी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या धंद्याची माहिती तेवढ्याच तत्परतेने देणे सुरू केले.पंधरा दिवसांत 95 तक्रारी आल्या. परंतु, सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यांना दिसणारे हे अवैध प्रकार पोलिसांच्या लेखी बहुतांश ठिकाणी आढळून आलेले नाहीत. कारण, पोलिस घटनास्थळी जाऊन आले. मात्र म्हणे, त्यांना या ठिकाणी अवैध असे काही सापडले नाही!

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला शहराला डॉ. के. व्यंकटेशम हे नवे पोलिस आयुक्त मिळाले. नव्या आयुक्तांनीही पदभार स्वीकारताच फोफावलेली गुन्हेगारी, चालणारे अवैध प्रकार आणि शहराची संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेला अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. तर, पुणेकरांनाही शहरात चालणार्‍या अवैध धंद्याबाबत थेट तक्रार करण्याचे आवाहन केले.सर्व सामान्य नागरिकांच्या तक्रारी मिळाल्यानंतर पोलिसांनीही कारवाई सुरू केली. परंतु, सर्वसामान्यांच्या ‘दृष्टी’ने खुले आम चालणारे अवैध धंदे  पोलिसांना मात्र आढळून आले नाही. कारण, नागरिकांनी तक्रार केलेल्या ठिकाणांवर पोलिसांनी पाहणी केली. त्यावेळी मात्र त्यांना गैरप्रकार दिसून आले नसल्याची माहिती समोर आली आहे. अवैध धंदे नागरिकांनाच दिसतात; मग, पोलिसांना का दिसत नाहीत, अशी चर्चा पुणेकरांमध्ये एकीकडे सुरू आहे. तर दुसरीकडे नागरिकांकडून बेकायदेशीर प्रकारांची माहिती मिळण्याची प्रतिक्षा स्थानिक पोलिस का करतात, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

शहरातील रस्त्यांवरील गुन्हेगारी रोखताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. घरफोड्या, वाहन चोरी,  सोनसाखळी आणि लुटमारीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत आहेत. वेश्या व्यवसायापासून ते अवैध हातभट्टी दारू विक्री आणि मटक्यासारखे जुगार अड्डेे मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये राजरोसपणे सुरू आहेत. याचा  सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.  पोलिसांनी एखाद्या ठिकाणी धडक अन् कठोर कारवाई केली तर, दुसर्‍याच दिवशी परत याठिकाणी हे धंदे पुन्हा जोमाने सुरू होतात. तक्रार करूनही कारवाई शून्य. अशा प्रकारांमुळे पोलिसांच्या कारवाईला अवैध धंदे चालवणारे घाबरत नाहीत की  सर्व काही सुरळीत चालण्यासाठी ‘अर्थपूर्ण’ मांडवली होते, हेही सर्वसामान्यांना समजण्यापलिकडचे आहे, अशीही चर्चा आहे. 

पंधरा दिवसांत 95 तक्रारी

गेल्या पंधरा दिवसांमध्ये नागरिकांनी एकूण 90 ते 95 तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी 7 ठिकाणी कॉलरने माहिती दिल्याप्रमाणे प्रकार सुरू असल्याचे आढळून आले.  त्यातील पाच ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. तसेच एका ठिकाणी  चौकशी केल्यानंतर अवैध  काही आढळून आलेले नाही.

तारखेनिहाय तक्रारीची संख्या

7 ऑगस्ट 3,  9 ऑगस्ट 15,  10 ऑगस्ट 3, 11 ऑगस्ट 4, 12 ऑगस्ट 4, 13 ऑगस्ट 5, 14 ऑगस्ट 6, 15 ऑगस्ट 7, 16 ऑगस्ट 2, 17 ऑगस्ट 5,  18 ऑगस्ट 3, 19 ऑगस्ट 10,  20 ऑगस्ट 3, 22 ऑगस्ट , 23 ऑगस्ट 7

सर्वाधिक तक्रारी जुगार अड्डे व हुक्क्याच्या अवैध धंदे दिसल्यानंतर याबाबत नागरिक पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती देतात. या ठिकाणाहून संबंधित पोलिस ठाण्याकडे तक्रारी वर्ग केल्या जातात. त्यानुसार त्या-त्या पोलिस ठाण्यातील कर्मचारी संबंधित ठिकाणी जातात. परंतु, कॉलरने दिलेली माहितीनुसार, तेथे गेल्यानंतर काहीही आढळून आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. सर्वाधिक तक्रारी  जुगार अड्डा, हातभट्टी दारू विक्री, लॉटरी व हुक्‍का पार्लरच्या आहेत. यासोबतच शाळेजवळ तंबाखूजन्य पदार्थ विक्री आणि हुक्क्याची नशा करत असल्याच्याही काही तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. तर, काही तक्रारी या पूर्ववैमनस्यातून केल्या जात असल्याचे तपासात दिसून आले आहे.