होमपेज › Pune › पुण्याच्या ‘हायपरलूप’ची अमेरिकेत खलबते

पुण्याच्या ‘हायपरलूप’ची अमेरिकेत खलबते

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 1:15AMपुणे : दिगंबर दराडे

पुणे महानगर प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येणार्‍या पुणे- मुंबई हायपरलूपच्या संदर्भात माहिती समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिकेला रवाना झाले आहेत. 
जगभरात सध्या चर्चिल्या जाणार्‍या या तंत्रज्ञानाचा वापर करून हे अशक्य वाटणारं स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. त्यासाठीची प्राथमिक तयारी म्हणून राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) अमेरिकेतील व्हर्जिन हायपरलूप वन यांच्यासह सामंजस्य करार करण्यात आला आहे.

त्याद्वारे पुणे- मुंबईदरम्यान पूर्व-व्यवहार्यता अहवाल (प्री-फिजिबिलिटी स्टडी) करण्यात येत आहे. हायपरलूपची संकल्पना समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. सध्या मुख्यमंत्री अमेरिका दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात पुणे महानगर प्राधिकरणाचे आयुक्‍त किरण गित्ते देखील सहभागी होणार आहेत. देशातील अत्यंत व्याग्र कॉरिडॉरमध्ये मुंबई-पुणे कॉरिडॉरचा समावेश होतो. दररोज किमान 50,000 वाहने या दोन्ही शहरांना जोडणार्‍या एक्स्प्रेस-वेवरून जातात. एक्स्प्रेस-वेवरील अपघात, ट्रॅफिक, वाहनांची गर्दी आदींचा विचार करता हा 160 किमीचा प्रवास पूर्ण करण्यासाठी किमान चार तास लागतात. 160 किमीपैकी 94.5 किमीचा प्रवास एक्स्प्रेस-वेवरून करावा लागतो. मात्र, हायपरलूपच्या माध्यमातून हा प्रवास केवळ 14 मिनिटांत करणे शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

पुणे-मुंबई प्रवास द्रुतगती मार्गाने (एक्स्प्रेस-वे) करा अथवा या दोन्ही शहरांना जोडणार्‍या रेल्वे मार्गाने करा, प्रवासासाठी किमान तीन तासांचा अवधी ठरलेलाच आहे. हा वेळ कमी करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. हायपूरलूप झाल्यास हा कालावधी अवघ्या 14 मिनिटांपर्यंत येऊ शकतो? हे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकाने पावले उचलली आहेत. हायपरलूप ही प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी भविष्यात वापरता येऊ शकते, अशी यंत्रणा आहे. रस्ते-रेल्वे किंवा विमान प्रवासापेक्षाही जलद गतीने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचण्यासाठी या यंत्रणेचा वापर अधिकाधिक वाढेल, असा विश्‍वास तज्ञ व्यक्‍त करीत आहेत. 

या संपूर्णपणे नव्या यंत्रणेच्या चाचण्या (ट्रायल रन) काही ठिकाणी घेण्यात आल्या असल्या, तरी अद्याप त्याचा व्यावसायिक वापर झालेला नाही. त्यामुळे, त्यासाठी नेमका खर्च किती येणार? यासह अन्य  गोष्टींची चर्चा मुख्यमंत्री करणार आहेत.