Sun, Aug 18, 2019 06:31होमपेज › Pune › विमानातून येऊन शहरात घरफोड्या! 

विमानातून येऊन शहरात घरफोड्या! 

Published On: Feb 12 2019 1:28AM | Last Updated: Feb 12 2019 1:35AM
पुणे : प्रतिनिधी

दुचाकी अन् कार घेऊन घरफोड्या करणार्‍यांची शहरात कमी नाही... पण, चक्क विमानातून येऊन शहरात घरफोड्या करणार्‍या एका हायप्रोफाइल चोरट्यासह त्याच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांतील पावणेपाच लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. 

वाहीद खुर्शीद मन्सुरी (33, रा. निगडी), रियासत रियाजुद्दीन मन्सुरी (28, रा. भोसरी, मूळ बिजनोर, उत्तर प्रदेश), रिजवान निजामुद्दीन शेख (25, रा. अजमेर, राजस्थान), फैसल जुल्फीकार अन्सारी (22), मोहम्मद सलमान झुल्फकार अन्सारी ऊर्फ सलमान अन्सारी (वय 27), नफासत वहीद अन्सारी (वय 29, तिघेही रा. उत्तर प्रदेश), मुशरफ यामीन कुरेशी (वय 35, रा. निगडी) अशी अटक करण्यात आलेल्या या महाभागांची नावे आहेत. 

मोहम्मद अन्सारी आणि नफासत अन्सारी हे दोघे उत्तर प्रदेशमधून पुण्यात विमानाने येत होते, तर इतरांकडे पिस्तूल व इतर वस्तू असल्याने ते रेल्वेने शहरात येत असत. पुण्यात आल्यानंतर रिक्षाचालक वाहीद खुर्शीद मन्सुरी आणि मुशरफ यामीन कुरेशी या दोघांच्या घरी, तर कधी हॉटेलमध्ये तीन ते चार दिवस थांबून घरफोड्या करून पसार होत होते. गेल्या महिन्यात कोंढव्यात नरेश मल्होत्रा आणि शक्ती ननवरे यांच्या फ्लॅटमध्ये दिवसा घरफोडी झाली होती. या प्रकरणाचा तपास कोंढवा पोलिस करत होते. वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा माग काढण्यात येत होता. या वेळी गुन्हेगार रिक्षाचा वापर करत असल्याचेही सीसीटीव्हीच्या पडताळणीत स्पष्ट झाले होते. रिक्षाच्या समोरच्या बाजूला हिरव्या रंगात 313 हा क्रमांक लिहिलेला होता. त्यावरून तपास केला असता, ही रिक्षा निगडीतील असल्याचे समोर आले. त्यानुसार रिक्षाचालक वाहीद मन्सुरीला ताब्यात घेण्यात आले. 

त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने इतर तीन साथीदारांसोबत घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि राजस्थान येथून रियासत मन्सुरी, रिजवान शेख, पैैसल अन्सारी यांना अटक केली. परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार, चेतन मोरे, उपनिरीक्षक संतोष शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.