Tue, Jun 02, 2020 18:46होमपेज › Pune › विहिरी, बोअरवेलचा जिल्हाधिकार्‍यांना अहवाल

विहिरी, बोअरवेलचा जिल्हाधिकार्‍यांना अहवाल

Last Updated: Nov 10 2019 1:38AM

संग्रहित फोटोपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व खासगी  विहिरी व बोअरवेलचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तो अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करून पिंपरी-चिंचवड महाालिका कार्यवाही करणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. 

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विविध सूचना केल्या आहेत. त्यांनी शहरातील सर्व विहिरी व बोअरवेल जिल्हाधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली ताब्यात घेऊन ते पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केली आहे. पाण्याचा टँकर लॉबीला आळा घालावा, असा सूचना केल्या आहेत.

त्यासंदर्भात पालिका शहरात 
सर्वेक्षण करणार आहे. सर्व विहिरी व बोअरवेलची पाहणी करणार आहे. त्यातील पाण्याची स्थिती तपासली जाईल. ते पाणी पिण्यास की इतर कोठे वापरता येईल, त्याचा प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. 

सदर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करून त्यापुढे पालिका कार्यवाही करणार आहे. तसेच, टँकर लॉबीकडून होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी नियोजन केले जात आहे. बांधकाम परवाने देणे बंद करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडला जाईल. सभेने मंजुरी दिल्यानंतर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. अनधिकृत नळजोडावर कारवाई सुरू आहे. अनधिकृत नळजोड अभय योजनेत दंड भरून अधिकृत केले जात आहेत. गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

पालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने भरारी पथक नेमले जाणार आहे. पाण्याचा अपव्यय करणारे, अनधिकृत नळजोड, गळती आदी बाबींची पाहणी हे पथक करणार आहे. पाण्याचा अपव्यय करणारे आणि अनधिकृत नळजोडधारकांवर कारवाई केली जाणार आहे. गळती तातडीने दुरुस्त केली जाणार आहे. तसेच, इतर आवश्यक कार्यवाही केली जात आहे.
मकरंद निकम, सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग

दररोज शहराला 510 एमएलडी पाणीपुरवठा
पवना धरणातून पालिका दररोज 480 एमएलडी पाणी रावेत बंधार्‍यातून उचलते. तसेच, एमआयडीसीकडून दररोज 30 एमएलडी शुद्ध पाणी घेतले जाते, असे एकूण 510 एमएलडी पाणीपुरवठा शहराला केला जात आहे. सर्व शहरात समन्यायिकपद्धतीने पाणी मिळावे म्हणून आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवून कपात केली जात आहे. तरीही, शहरातील सखल भागांत व हाउसिंग सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होऊन टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत.