होमपेज › Pune › बारामती : आरोग्य केंद्रात मद्यधुंद पोलिस कर्मचाऱ्याचा धिंगाणा

बारामती : आरोग्य केंद्रात मद्यधुंद पोलिस कर्मचाऱ्याचा धिंगाणा

Last Updated: Feb 26 2020 4:25PM
बारामती : पुढारी वृत्तसेवा

पुणे ग्रामीण मुख्यालयात कार्यरत असलेल्या अमित सुभाष खांडेकर (रा. लाटे-माळवाडी, ता. बारामती) या पोलिस कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत येत होळ प्राथमिक आरोग्य केंद्रात धिंगाणा घातला. ज्येष्ठ महिला परिचारिकेसह सेवकाला मारहाण करत सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. याबाबत होळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका परिचारिकेने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. मंगळवारी (दि. 25) रोजी दुपारी दोन ते सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली. 

फिर्यादी परिचारिका प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवेवर असताना खांडेकर हा तेथे शिविगाळ करत आला. शिविगाळ का करता अशी विचारणा परिचारिकेने त्याला केली असता तो आणखी जोराजोराने शिविगाळ करू लागला. मला रुग्णवाहिका पाहिजे असे म्हणू लागला. तुम्ही त्यासाठी वैद्यकिय अधिकाऱ्यांना फोन करा असे उत्तर परिचारिकेने दिले असता त्याने या ज्येष्ठ परिचारिकेला हाताने मारहाण केली आणि दरवाजातून ढकलून देत तो आत गेला. 

त्यावेळी शिपाई यशवंत भापकर हे त्याला समजावून सांगत असताना त्यांनाही मारहाण करून शिविगाळ आणि दमदाटी केली. अन्य कर्मचारी वर्गालाही त्याने शिविगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. होळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ही माहिती वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर वडगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 

दरम्यान, या कर्मचाऱ्याला सेवेतून अनेकदा निलंबित केले आहे. त्याचे मानसिक संतुलन ठीक नाही. काही दिवसांपूर्वीच त्याला सेवेत घेण्यात आले होते. परंतु अद्यापही त्याचे संतुलन ठीक नाही. त्याची शारिरिक स्थिती ठिक नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वडगाव पोलिस ठाण्याकडून सांगण्यात आले.