Mon, Sep 16, 2019 05:53होमपेज › Pune › बारामतीत भाजपाचे शिवधनुष्य कोण उचलणार?

बारामतीत भाजपाचे शिवधनुष्य कोण उचलणार?

Published On: Nov 13 2018 1:27AM | Last Updated: Nov 13 2018 12:15AMपुणे : सुहास जगताप

बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सत्ताधारी भाजपने आता लक्ष वळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अ. भा. अध्यक्ष, खासदार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांचे ऐक्य आणि राज्यात काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू करताच या मतदारसंघात पवार यांच्या कन्या, विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे. सुळे यांच्याविरोधात स्थानिक प्रबळ उमेदवाराचा शोध भाजप श्रेष्ठींनी सुरू केला आहे.भाजपाने हे प्रयत्न सुरू केले असले तरी हे शिवधनुष्य कोण उचलणार हा मोठा प्रश्‍न आहे. कांचन कुल यांच्याशिवाय आणखी दोन जिल्ह्यांतील आणखी दोन बलाढ्य नेत्यांची नावे भाजपा पक्षश्रेष्ठींसमोर आहेत; परंतु ते दुसर्‍या पक्षात असल्याने त्यांना आपल्याकडे वळवून सुळे यांच्याविरोधात उभे राहण्यासाठी तयार करण्यासाठी भाजपा श्रेष्ठींना फार धावपळ करावी लागणार असल्याने ते टाळून इतर मार्ग शोधण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे.कोणत्याही स्थितीत पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघात गुंतवून ठेवण्याचे डावपेच या वेळी यशस्वी करायचेच, असा निर्धार भाजपने केला असल्याचे पक्षांतर्गत हालचालींवरून दिसत आहे. राज्यात विरोधी पक्षांची ताकद ज्येष्ठ नेते शरद पवार हेच आहेत. त्यांनाच घरच्या मतदारसंघात घेरले तर राज्यातील ताण जरा कमी होईल, असा यामागे व्होरा आहे. 

दौंडचे रासपचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांचे नाव यातूनच सुळे यांच्याविरोधातील भाजपा उमेदवार म्हणून पुढे आले आहे. कांचन कुल यांचे नाव चर्चेत आल्याने मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून, चर्चेला उधाण आले आहे.  2014 च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे अवघ्या 69719 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. हे आजपर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्यानंतर सुप्रिया सुळे या दोघांनाही बारामती मतदारसंघात मिळालेले सर्वात कमी मताधिक्य आहे. सुप्रिया सुळे यांच्यासाठी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जी राजकीय स्थिती होती तशीच आताही आहे. त्यामुळे कांचन कुल यांच्यासारखा स्थानिक बलाढ्य उमेदवार भाजपातर्फे त्यांच्यासमोर उभा राहिल्यास बारामती मतदारसंघाच्या लढतीचे चित्र पूर्णपणे बदलून जाईल. गेल्या निवडणुकीत दौंडमध्ये सुळे 25548 मतांनी पिछाडीवर राहिल्या होत्या. या वेळी कांचन कुल उमेदवार असतील तर ही पिछाडी वाढू शकते; त्याचबरोबर गेल्या वेळी बारामती विधानसभा मतदारसंघात सुळे यांना मिळालेली फार मोठी आघाडी कमी करण्यातही कांचन कुल यशस्वी होऊ शकतात, असाही कयास मांडला जात आहे. कारण कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे; त्यामुळे तेथे त्यांचे घराणे परिचित असल्याने तसेच नातेवाईक, मित्रमंडळी यांचा मोठा गोतावळा असल्याने कांचन कुल या बारमतीतच सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान उभे करून बारामतीत त्यांना मिळणारी निर्णायक आघाडी मर्यादित करू शकतात, असा अंदाज बांधला जाता आहे. गेल्या वेळी सुळे यांच्यासमोर चांगली लढत देणारे रासपचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर यांची भूमिका काय राहते हेसुद्धा उमेदवारी ठरविताना महत्त्वाचे ठरणार आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघात  राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे राजकीय गणित कसे जुळते यावर सुळे यांची लोकसभेची वाटचाल सुकर होणार की अडचणीची होणार हे ठरेल. या दोन पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांचे मनोमीलन कसे होते हे पाहणे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातही राष्ट्रवादीने गावोगावी निर्माण केलेल्या सुभेदारांपैकी राज्यातील भाजपाच्या सत्तेची फळे चाखलेले सुभेदार ऐनवेळी काय भूमिका घेतात यावरही बरेच अवलंबून आहे. हे अस्तनीतील निखारे घेऊनच सध्या राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे.  सुप्रिया सुळे यांना या सुभेदारांच्या करामतींकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे. या सुभेदारांच्या जोरावरच भाजपची सुप्रिया यांना घेरण्याची तयारी सुरू आहे. या दोन्ही पक्षांतील तालुकास्तरावरील अनेक नेते भाजपाच्या हाती लागलेले आहेत. 

धाडस कोण करणार?

भाजपा नेत्यांच्या काहीही हालचाली आणि डावपेच सुरू असले तरी शरद पवार यांच्याच जिल्ह्यात त्यांच्याच कन्येच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस जिल्ह्यातील कोणता प्रस्थापित नेता करेल का, याबाबतच मोठी शंका राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. ज्याला भविष्यात जिल्ह्यात नव्हे तर राज्यात राजकारण करावयाचे आहे तो पवारांना अंगावर घेण्याचे धाडस करेल का, हा मोठा प्रश्‍न आहे; त्यामुळे हे शिवधनुष्य कोण उचलणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

शिवतारेंची भूमिका महत्त्वाची

बारामती लोकसभा मतदार संघात पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पवारांच्या विरोधात रोखठोक भूमिका त्यांनी घेतलेली आहे, तसेच राजकीय डावपेच खेळण्यात या मतदारसंघात युतीकडे दुसरा माहीर नेता नाही. शिवतारे यांचे मतदारसंघात सर्वदूर पवार विरोधकांशी संबध आहेत.