होमपेज › Pune › महोत्सवातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न

महोत्सवातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 28 2017 11:56PM

बुकमार्क करा
पिंपरी : पूनम पाटील

उद्योगनगरी म्हणून विकसित असलेले पिंपरी-चिंचवड शहर आता सांस्कृतिक क्षेत्रातही वेगाने पुढे जात आहे. त्यादृष्टीने या वर्षी शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आले. कविसंमेलन, व्याख्यानमाला, बालकुमार साहित्य संमेलन, शिवार साहित्य संमेलन; तसेच पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल  आदी कार्यक्रमांची या वर्षात रसिकांना मेजवानी मिळाली.  सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सण-उत्सव यांंबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची या वर्षी नव्याने सुरुवात करण्यात आली. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्य नाट्य हौशी स्पर्धा; तसेच एकांकिका स्पर्धा भरवण्यात आल्या. शहरात नाट्यसंस्कृती रुजवण्यात नाट्य परिषदेचा महत्त्वाचा वाटा असून, प्रतिभावंत कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम नाट्य परिषद करत आहे. या वर्षी बालनाट्य स्पर्धांद्वारे बालकलाकारांना नाट्यक्षेत्रात प्रोत्साहन देण्यात आले.  वर्षभर नाट्य परिषदेच्या वतीने विविध नाट्य व गायन स्पर्धांद्वारे स्थानिक कलाकारांना संधी मिळत असल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी

पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य व कला अकादमीच्या वतीने या वर्षी पद्मश्री  नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार, पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार, नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार यांसह उपेक्षित कष्टकर्‍यांना सन्मान म्हणून श्रमप्रतिष्ठा पुरस्कार देण्यात आला; तसेच शिक्षक प्रतिभा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य  अकादमीच्या वतीने शिवार संमेलनाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शेतकर्‍यांचाही सन्मान करण्यात आला.

वसुंधरा किर्लोस्कर महोत्सवातून संस्कृती व पर्यावरण संवर्धन

आंतरराष्ट्रीय वसुंधरा किर्लोस्कर चित्रपट महोत्सवाच्या वतीने संस्कृती व पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या या महोत्सवातून नदी संस्कृती व पर्यावरण जपण्यासाठी विविध स्पर्धांबरोबरच चित्रपट दाखवण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती जागृती होउन संस्कृती संवर्धन होईल या हेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. 

विविध साहित्यिक संस्थांतर्फे कविसंमेलन व काव्यस्पर्धा

पिंपरी-चिंचवड साहित्य संवर्धन समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षभरात वैविध्यपूर्ण काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळातर्फे श्रावणी काव्यस्पर्धा; तसेच विविध प्रादेशिक मंडळांच्या वतीने आपापल्या भागातील संस्कृतीची ओळख शहरवासीयांना व्हावी या हेतूने विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. 

केरळ महोत्सव; तसेच चालिहो महोत्सव यांसह मोरया संजीवन समाधी सोहळा यंदा शहरात केरळ महोत्सव; तसेच चालिहो महोत्सव आणि छटपूजा यांसह परप्रांतीयांचे उत्सव उत्साहात साजरे करण्यात आले; तसेच नुकताच चिंचवड येथे श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा उत्साहात पार पडला.  

व्याख्यानमालांची पर्वणी

शहरातील विविध संस्थांच्या वतीने यंदाही चिंचवड, शाहूनगर, यमुनानगर आदी भागात विविध विषयांवर आधारित व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित रसिकांना नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. या वर्षी विविध नाट्यसंस्था, संस्कृती व साहित्य संवर्धन समिती यांच्या वतीने साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ राबवण्यात आली. यामुळे तरुण पिढीला संस्कृतीची ओळख होऊन शहराच्या सांस्कृतिक विकासास हातभार लागेल, अशी अपेक्षा सांस्कृतिक चळवळीत काम करणार्‍या व्यक्तींनी व्यक्त केली आहे.