Fri, Apr 26, 2019 20:06होमपेज › Pune › पुण्‍यात ॠषीपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण सोहळा (video)

पुण्‍यात अथर्वशीर्ष पठण सोहळा (video)

Published On: Sep 14 2018 2:28PM | Last Updated: Sep 14 2018 2:29PMपुणे : प्रतिनिधी

ओम् नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नम:... मोरया, मोरया... च्या जयघोषाने तब्बल २५ हजार पेक्षा अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पारंपरिक वेशात पहाटे ४ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक पहायला मिळाला. 

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी फिनोलेक्स ग्रुपचया रितू छाब्रिया, वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते, आमदार नीलम गो-हे, एमएनजीएल चे सुनील सोनटकके,  ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अरुण भालेराव, शुभांगी भालेराव यांसह महिला कार्यकर्त्या व ३० देशातील परदेशी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 

दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणातील या उपक्रमाचे ३२ वे वर्ष होते. तब्बल ३२ वर्षांपूर्वी महिलांचा सहभाग या गणेशोत्सवात असावा, याकरीता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांच्या विचारातून या उपक्रमाला सुरुवात झाली. केवळ १०१ महिलांपासून सुरु झालेल्या उपक्रमात आज  २५ हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या.