Wed, Feb 26, 2020 17:45होमपेज › Pune › ‘करोना’बाबत दक्षतेचे राज्यात निर्देश

‘करोना’बाबत दक्षतेचे राज्यात निर्देश

Last Updated: Jan 24 2020 2:19AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा
चीनमध्ये साडेपाचशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून आलेल्या आणि  17 लोकांचा मृत्यू झालेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात होण्याची शक्यता कमी आहे. तरीही त्या अनुषंगाने राज्यातील सरकारी रुग्णालये, महापालिका रुग्णालयांमध्ये येणार्‍या इन्फलूएन्झासदृश रुग्ण व श्‍वसन संस्थेचा तीव्र प्रादुर्भाव असणार्‍या रुग्णांचे सर्वेक्षण करावे, अशा सूचना आरोग्य संचालकांनी सर्व जिल्ह्यांना दिल्या आहेत.

राज्याच्या आरोग्य संचालक (पुणे) डॉ. अर्चना पाटील यांनी याबाबतचा लेखी आदेश राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालये, महापालिकांचे आरोग्य अधिकारी आणि वैद्यकिय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांना 22 जानेवारीला काढले आहेत. 

चीनमधील हुबेई प्रांतातील कहान शहरात या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने मुंबई, दिल्‍ली व कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बाधित देशांतून येणार्‍या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुरू केले आहे. 

अशा प्रवाशांमधून आढळलेल्या संशयित रुग्णांचा  व त्यांच्या निकट सहवासितांचा पाठपुरावा व आवश्यक कार्यवाही एकात्मिक  रोग सर्वेक्षण कार्यक्रमामार्फत करण्यात येणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान (एनआयव्ही) येथे या आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे.

इन्फलूएन्झा संशयित रुग्ण आणि श्‍वसन संस्थेचा तीव्र प्रादुर्भाव या आजारांचे सर्वेक्षण सर्व आरोग्य संस्थांनी करणे आवशक आहे. पाच वर्षाच्या आतील बालकांना न्यूमोनिया, तर पाच वर्षावरील ज्या रुग्णांना अचानक येणारा तीव्र ताप, खोकला, घसा बसणे, दम लागणे, श्‍वसनास अडथळा या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. असा रुग्ण आढळून आलाच, तर जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष, गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर सुसज्ज ठेवण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.