Mon, Jul 13, 2020 06:08होमपेज › Pune › विमानतळाचा नियम बांधकामांच्या मुळावर!

विमानतळाचा नियम बांधकामांच्या मुळावर!

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 12:32AMपुणे : पांडुरंग सांडभोर

सुरक्षिततेच्या कारणास्तव लोहगाव आणि एनडीए विमानतळानजीक सहा किलोमीटरच्या परिघातील बांधकामांसाठी संरक्षण विभागाची एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे कोथररूड, कर्वेनगरपासून, औंध बाणेरपर्यंत आणि खराडीपासून बंडगार्डन-कोरेगाव पार्कपर्यंतच्या बांधकामांची परवानगी घेण्यासाठी आता दिल्ली गाठावी लागणार आहे. इतकेच नव्हे तर शहरातील 12 ते 15 मजल्यांच्या इमारतींनाही हा नियम लागू झाल्याने खळबळ उडणार आहे.

शहरातील बांधकाम परवानगीची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी पालिका प्रशासनाचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. मात्र, संरक्षण खात्याच्या नव्या आदेशाने ही बांधकाम परवानगीची प्रक्रिया आणखीनच क्‍लिष्ट आणि डोकेदुखीची बनली आहे. शहराच्या हद्दीत लोहगाव आणि एनडीए अशा दोन विमानतळांचा समावेश आहे. त्यात लोहगाव विमानतळाच्या परिसरातील 100 मीटर आणि ‘बॉम्ब डम्प’च्या 900 मीटर परिसरात येणार्‍या बांधकामासाठी संरक्षण मंत्रालयाचे एनओसी घेणे बंधनकारक आहे. एनडीएतील विमानतळाच्या परिसरात अशी परवानगीची गरज नव्हती. मात्र, आता संरक्षण खात्याने लोहगाव आणि एनडीएच्या परिसरातील बांधकामासाठी आता नव्याने निर्बंध घातले आहेत. 

संरक्षण खात्याच्या या निर्णयाने या दोन्ही विमानतळांच्या वर्तुळाकार 6 किमी परिसरात रेड झोन निश्‍चित करण्यात आला आहे. त्याचबरोबर आणखी एक गुलाबी रंगाचा (पिंक) झोन निश्‍चित करण्यात आला असून, त्यात प्रामुख्याने संपूर्ण शहरातील 637 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींचा समावेश असेल. याव्यतिरिक्त विमानांच्या टॅकऑफ आणि लँन्डिगचा झोन निळ्या रंगाचा 18 किमीपर्यंतचा फनेल झोन निश्‍चित करण्यात आला असून, त्यात समुद्र सपाटीपासून 627 मीटरपर्यंतच्या प्रत्येक बांधकामासाठी ही एनओसी बंधनकारक आहे. त्यानुसार आता शहरातील 12 ते 15 किमीच्या प्रत्येक बांधकामासाठी ही एनओसी लागणार आहे आणि ती असल्याशिवाय  संबधित बांधकामासाठी परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश संरक्षण विभागाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार पालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

दरम्यान, शहरातील सर्व भागांतील जमिनींची उंची एक सारखी नसल्याने, त्यासाठी आधी सर्व्हे ऑफ इंडीयाकडून त्याच्या भौगोलिक उंचीची तपासणी करून घ्यावी लागणार आहे. धक्कादायक म्हणजे संरक्षण मंत्रालयाचे कार्यालय थेट दिल्लीत आहे. त्यामुळे या विमानतळाच्या परिघात येणार्‍या प्रत्येक बांधकामाचा प्रस्ताव दिल्लीपर्यंत जाणार आहे. ही सगळी प्रक्रिया किचकट असल्याने बांधकाम परवानगी घेणे अत्यंत डोकेदुखीचे होऊन बसणार आहे. 

लोहगाव विमानतळाच्या 6 किमीतील परिसर - लोहगाव, धानोरी, कळस, विश्रांतवाडी, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा, चंदननगर खराडी, बंडगार्डन तसेच कोरेगाव पार्कचा काही भाग,  इत्यादी.

एनडीएच्या विमानतळाचा परिसर - कोथरूड, कर्वेनगर, केळेवाडी, वारजे माळवाडी, उत्तमनगर, कोंढवे-धावडे परिसर

परवानगीसाठी येणार दीड ते दोन लाखांचा खर्च

बांधकाम परवानगीच्या संरक्षण खात्याची एनओसी आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या परवानगीसाठी तब्बल दीड ते दोन लाखांचा खर्च येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड बांधकाम धारकाला करावा लागणार आहे.