होमपेज › Pune › तब्बल ३१ वर्षांनी दिली दहावीची परीक्षा

तब्बल ३१ वर्षांनी दिली दहावीची परीक्षा

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 09 2018 12:46AMपुणे : प्रसाद जगताप / लक्ष्मण खोत

परिस्थिती, वेळेवर मात करत, आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणार्‍या जिद्दीचे उदाहरण यंदा समोर आले आहे. तब्बल 31 वर्षांनी परीक्षा देत दोन मुलांचा बाप दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. दिलीप महादेव रेणुसे हे मूळचे पुण्यातील वेल्हे तालुक्यातील पाबे गावचे रहिवासी आहेत. त्यांनी दोन मुले झाल्यानंतर आपली शिक्षणाची आवड जोपासत दहावी परीक्षेत उत्तम यश मिळविले. 

या परिसरातील लोक त्यांना राजू आप्पा म्हणून जास्त करून ओळखतात. राजू अप्पा 1988-89 साली तोरणा विद्यालय, वेल्हे येथे दहावी परीक्षेसाठी बसले होते. मात्र, घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. तब्बल 31 वर्षांनंतर 10 वी परीक्षेला बसत राजू अप्पा 10 उत्तीर्ण झाले आहेत. आई-वडिलांची इच्छा होती की, मुलाने 10 परीक्षेत पास व्हावे, मात्र, परिस्थितीअभावी शिक्षण घेता आले नाही. आता ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

राजु अप्पांना दोन मुले आहेत. थोरला मुलगा आता दहावीला गेला आहे. तर लहान मुलगा 8 वीला आहे. दहावीची परीक्षा देताना सुररुवातीला राजू अप्पांना जरा वेगळचं वाटलं. मात्र, आपली आवड आणि शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असल्यामुळे ते पुन्हा लहानग्यांबरोबर वेल्ह्यातील तोरणा विद्यालयात दहावीच्या परीक्षेला बसले आणि दिवसा काम आणि रात्री रोज दोन तास अभ्यास करून उत्तीर्ण झाले.