Sun, Oct 20, 2019 05:59होमपेज › Pune › नवीन धोरणानुसार घरमालक रडारवर

नवीन धोरणानुसार घरमालक रडारवर

Published On: Jul 12 2019 2:07AM | Last Updated: Jul 12 2019 1:39AM
पुणे : प्रतिनिधी

नव्या धोरणानुसार आता घरमालकही शासनाच्या रडारवर आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यासाठी केंद्र सरकार आता नवीन कायदा तयार करीत आहे. ‘मॉडेल रेंट अ‍ॅक्ट’करता लागणारी माहिती स्थानिक प्रशासनाकडून शासन स्तरावरून घेण्यात येत आहे. 

नव्या कायद्याच्या विधेयकाचा मसुदा बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे. हा कायदा घरमालकांसाठी काहीसा कडक; तर भाडेकरूंच्या हक्कांचे संरक्षण करणारा आहे. नवीन कायद्यामध्ये भाडेकरूला काही अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार घरदुरुस्ती, घर तपासणी किंवा तशाच एखाद्या कारणासाठी भाडेकरू राहत असलेल्या मालमत्तेत घरमालक प्रवेश करणार असेल, तर मालकाला त्याची पूर्वकल्पना द्यावी लागणार आहे. 

भाडेकरू आणि  घरमालक यांच्यामध्ये करण्यात येणार्‍या नवीन कायद्यानुसार मालमत्ताधारक व्यक्तीला आपले घर, जमीन, भूखंड ,कार्यालय, दुकान आदी गोष्टी भाडेतत्त्वावर द्यायच्या असतील तर त्यासाठी हा कायदा महत्त्वाचा ठरणार आहे. 

घरमालकालाही अधिकार

नवीन कायदा घरमालकालाही काही अधिकार देतो. त्यानुसार भाडेकरार संपूनही एखादा भाडेकरू घर रिकामे करत नसल्यास, घरमालक त्या भाडेकरूस प्रतिमहिना भाड्याच्या चौपट रक्कम घरभाडे म्हणून आकारू शकतो. हाच प्रकार जर दुकान, कार्यालयांसाठी घडत असेल, म्हणजेच भाडेकरू दुकानाची जागा करार संपूनही रिकामी करत नसेल, तर घरमालक पुढील दोन महिने संबंधित भाडेकरूस दुप्पट भाडे आकारू शकतोॉ; तसेच त्यानंतर पुढील महिन्यासाठी भाड्यापोटी भाड्याच्या चौपट रक्कम आकारू शकतो.

24 तास अगोदर नोटीस द्यावी लागणार

घरभाडे करारानुसार  घरमालक भाडेकरूला करार संपण्यापूर्वी घराबाहेर काढू शकत नाही. भाडेकरूने सलग दोन महिने घरभाडे दिले नाही, तरच हा नियम शिथिल करण्यात येईल. तसेच, भाड्याच्या घराचा चुकीच्या कारणासाठी वापर भाडेकरू करत नाही, तोपर्यंत त्याला बाहेर काढता येणार नाही. घरमालकाला भाडेकरूस 24 तास अगोदर नोटीस पाठवून कल्पना द्यावी लागेल.