Mon, Jul 13, 2020 06:32होमपेज › Pune › ...तर मी मंत्रिपद सोडायला तयार : रामदास आठवले 

...तर मी मंत्रिपद सोडायला तयार : रामदास आठवले 

Published On: Mar 21 2019 6:09PM | Last Updated: Mar 21 2019 6:19PM
महाड : प्रतिनिधी

रिपब्लिकन ऐक्य होणार असेल तर मी मंत्रिपद सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्यासाठी तयार असतील, तर त्यांनी रिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्ष व्हावे,  असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केले. महाड येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे ऐतिहासिक क्रांतिस्तंभ येथे आयोजित जाहीर अभिवादन सभेत आठवले बोलत होते. 

यावेळी  विचारमंचावर आरपीआय रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड, सुमीत मोरे,  काकासाहेब खंबाळकर, आमदार भरत गोगावले,  सिद्धार्थ कासारे, सूर्यकांत वाघमारे, महेंद्र शिर्के, सुमीत वजाळे,  चंद्रशेखर कांबळे, प्रावीन मोरे, हेमंत रणपिसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

"मी ज्यांच्या सोबत जातो त्या पक्षाची सत्ता येते, त्यांना मुख्यमंत्री पद मिळते. त्या बदल्यात ते मला मंत्रिपद देतात तर बिघडले कुठे? माझ्या हाती आहे झेंडा निळा म्हणून त्यांचा आहे माझ्या मंत्रिपदावर डोळा ! माझे मंत्रिपद घालविण्याचा विचार करण्यापेक्षा रिपब्लिकन ऐक्य करून समाजात मंत्रीपद वाढविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य करावे असे सांगत मला मंत्रीपदाची फिकीर नाही'' असे वक्तव्य रामदास आठवले यांनी करून रिपब्लिकन ऐक्याची साद आंबेडकरी जनतेला घातली. 

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ९२ वर्षांपूर्वी महाडमध्ये पाण्याला स्पर्श करून मानवी मूलभूत हक्कांचा समतेचा लढा उभारून क्रांती केली. एका बाजूला आहे शिवरायांच्या रायगडाचा पहाड  तर एका बाजूला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिभूमीचा महाड.  असे महाड चवदार तळे सत्याग्रहावेळी सनातनी विरोधकांनी सत्याग्रहिंवर दगडफेक,  हल्ले केले. रक्तबंबाळ होऊन सत्याग्रही भीमसैनिक डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडे येऊन आम्हाला प्रतिहल्ला करण्याची परवानगी मागू लागले तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना हिंसेचे उत्तर हिंसेने देऊ नका असे बजावले. त्यांच्या डोक्यातील वाईट द्वेष विचार आज न उद्या दूर होईल  असे सांगितले.

अज्ञान दूर झाल्याने आज चवदार तळ्याच्या  पाण्याला आपण स्पर्श करताना  कोणी विरोध करीत नाही. मानवी मूलभूत अधिकार कोट्यवधी शोषितांना मिळवून देण्याचा मानवमुक्तीचा लढा डॉ बाबासाहेब आंबेडकर जिंकले आहेत. त्या दिग्विजयी नेत्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी; महाड क्रांतिदिनी अभिवादन करण्यासाठी आपण आलो आहोत असे रामदास आठवले म्हणाले. 

समाजात विनाकारण तेढ निर्माण करणे योग्य नाही. मागसावर्गीयांसह सवर्ण  सर्व समाज एकत्र आला पाहिजे. भारतीय दलित पँथर च्या शाखा स्थापन करताना मी सांगत होतो की सवर्ण समाजाविरुद्ध दलित पँथर नाही. समाजात समता निर्माण झाली पाहिजे यासाठी मी काम करीत असून समाजिक ऐक्यासाठी आपण शिवशक्ती भीमशक्ती एकत्र केली. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशी मी पहिली मागणी केली होती असे  रामदास आठवले  म्हणाले.