होमपेज › None › तिहेरी तलाक : आज पुन्‍हा राज्यसभेत परीक्षा

तिहेरी तलाक : आज पुन्‍हा राज्यसभेत परीक्षा

Published On: Aug 10 2018 10:28AM | Last Updated: Aug 10 2018 10:28AMनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

तिहेरी तलाक कायद्यात तीन सुधारणांसाठी गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर आज (१० ऑगस्‍ट) हे सुधारित विधेयक पुन्‍हा राज्यसभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी हे विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्‍न करणार आहे. 

‘मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक २०१७' मध्ये गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारणांस मंजुरी दिली. त्यानंतर आज वरिष्‍ठ सभागृहात हे विधेयक मंजुरीसाठी मांडले जाणार आहे. मूळ विधेयकाला यापूर्वीच लोकसभेने मंजुरी दिली आहे. मात्र, राज्यसभेत राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीकडे पूर्ण बहुमत नसल्याने सरकारला इतर प्रादेशिक पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. या विधेयकास राज्यसभेत मंजुरी मिळाल्यास पुन्‍हा हे विधेयक मंजुरीसाठी लोकसभेत पाठविण्यात येईल.

तीन तलाकचे विधेयक सरकारच्या दृष्‍टीने महत्त्‍वाचे आहे. त्यामुळे आजच्या राज्यसभेतील महत्त्‍वाचे विधेयक म्‍हणून अजेंड्यावर हा विषय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आज जर या विधेयकास राज्यसभेची मान्यता मिळाली नाही, तर सरकार अध्यादेशासह इतर पर्यायांचा शोध घेऊ शकते. 

दरम्यान, लोकसभेत मंजूर झालेल्या मूळ मसुद्यात गुरुवारी तीन महत्त्‍वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. पतीने तिहेरी तलाक पद्धतीने घटस्फोट दिल्यास त्याविरोधात स्वत: पत्नी अथवा रक्‍तसंबंध असणारे नातेवाईक यांनी एफआयआर दाखल केली, तरच त्यास दखलपात्र गुन्हा मानले जाईल. पती - पत्नीस सामोपचार करायचा असल्यास न्यायाधीशांसमोर योग्य त्या अटींनुसार सामोपचार घडविता येऊ शकेल. तिहेरी तलाक घेतल्यास याप्रकरणी जामीन मिळू शकतो. मात्र, त्यापूर्वी न्यायाधीश पत्नीची बाजू ऐकून घेतील आणि त्यानंतरच जामिनाविषयी निर्णय देतील.