Fri, Jan 24, 2020 04:52
    ब्रेकिंग    होमपेज › None › कर्नाटक विधानसभा कामकाजाला स्थगिती, राजकीय नाट्य शिगेला 

कर्नाटक विधानसभा कामकाजाला स्थगिती, राजकीय नाट्य शिगेला 

Published On: Jul 18 2019 7:29PM | Last Updated: Jul 18 2019 7:29PM
बेंगळुरू : पुढारी ऑनलाईन 

कर्नाटकात राजकीय नाट्य शिगेला पोहोचले आहे. गुरुवारी, कुमारस्वामी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याआधीच सभागृहाचे काम तहकूब करण्यात आले. यामुळे भाजपाच्या नाराज आमदारांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पांसह सभागृहातच धरणे आंदोलन सुरू केले. 

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकारच्या भविष्याबाबत आज (गुरुवार) रात्रीपर्यंत निर्णय लागण्याची शक्यता होती. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी गुरुवारी, दिवस संपेर्यंत कुमारस्वामी सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाची प्रक्रिया पूर्ण करा, असे लेखी पत्र अध्यक्ष रमेश कुमार यांना दिले. मात्र राज्यपालांच्या पत्राकडे दुर्लक्ष करून सभागृहाचे आजचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. या निर्णयावर भाजपा आमदारांनी नाराजी व्यक्त केली असून राज्यपालांच्या पत्राला विधानसभा अध्यक्षांनी उत्तर द्यावे आणि आजच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यावे, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी भाजप आमदार रात्रभर सभागृहाबाहेर धरणे आंदोलन करणार आहेत. 

कुमारस्वामी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा उद्या (शुक्रवार) सकाळी ११ वाजल्यापासून विधानसभेत पुन्हा सुरु होणार आहे. 

सभागृहात चर्चेवेळी बी. एस. येडियुराप्पा बोलत असताना काँग्रेस आमदारांनी गोंधळ घातला. त्यांच्या भाषणावेळी काँग्रेसचे डी. के. शिवकुमार उभे राहिले आणि त्यांनी आरोप केली की, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा देशाची तसेच कोर्टाची दिशाभूल करीत आहेत. यावेळी गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज काहीवेळ तहकूब करण्यात आले.

काँग्रेसकडून सिद्धरामय्या सभागृहात बोलत असताना देखील भाजपच्या आमदारांनी त्यांना विरोध केला. विश्वासदर्शक ठरावावर बोलताना मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी म्हणाले की, विरोधकांना सरकार पाडण्याची घाई झाली आहे. 

दरम्यान, आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान होत असताना १९ आमदार विधानसभेत पोहोचले नाहीत. यामुळे स्पष्ट होत आहे की जर विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले तर कुमारस्वामी यांच्या सरकार अल्पमतात येऊ शकते.  

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर काल (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला झटका दिला. विधानसभेत होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावेळी १५ आमदारांना हजर राहण्याची सक्ती केली जाऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.