Sat, Oct 19, 2019 09:47होमपेज › None › राहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव

राहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव

Published On: Sep 17 2019 8:02PM | Last Updated: Sep 17 2019 8:02PM

राहुल पाटीलनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

बेळगावचे सुपूत्र राहुल पाटील यांना मालदीव येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल युथ पीस अ‍ॅम्बॅसिडर ट्रेनिंग कार्यक्रमात ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर पदकाने सन्मानित करण्यात आले. सुमारे 30 देशातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे तरुण कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. मालदीवच्या युथ अँड स्पोर्ट मंत्रालयातर्फे माले येथे ग्लोबल युथ पीस अ‍ॅम्बॅसिडर ट्रेनिंग आयोजित करण्यात आले होते. 

यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुण सामाजिक कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या या कार्यक्रमात मालदीवच्या सामाजिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते राहुल पाटील यांना ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर पदकाने सन्मानित करण्यात आले.

यावेळी चर्चासत्रात राहुल पाटील यांनी जम्मू – काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 संपुष्टात आणल्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे महत्व विशद केले. पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने कलम 370 संपुष्टात आणण्याच्या निर्णयास विरोध केला. मात्र, कलम 370 संपुष्टात आणणे हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे प्रतिपादन राहुल पाटील यांनी केले. पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यापेक्षा आपल्या देशातील बलुचिस्तान व इतर भागातील मानवी हक्क्कांच्या गळचेपीविषयी बोलावे, असे प्रत्युत्तर त्यांनी पाकिस्तानच्या शिष्टमंडळास दिले.