Fri, Jan 24, 2020 04:52
    ब्रेकिंग    होमपेज › None › काश्मीरमधील परिस्थितीचा मंत्रीसमितीने घेतला आढावा

काश्मीरमधील परिस्थितीचा मंत्रीसमितीने घेतला आढावा

Published On: Aug 17 2019 7:45PM | Last Updated: Aug 17 2019 7:45PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

चालू महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 संपुष्टात आणले होते. तेव्हापासून भारताला त्रास देण्याचे धोरण पाकिस्तानने अवलंबले आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील परिस्थिती आणि पाककडून सुरु असलेली आगळीक या मुद्द्यावर शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

कलम 370 रद्द झाल्यापासून पाकने कांगावा चालविला आहे. चीनच्या मदतीने पाकने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत काश्मीरचा विषय नेण्यात यश मिळवले असले तरी चीन वगळता अन्य कोणाही प्रमुख देशाने पाकला किंमत दिलेली नाही. 

मागील काही दिवसांपासून पाककडून भारतीय हद्दीत गोळीबार तसेच मोर्टरद्वारे मारा केला जात आहे. पाकच्या गोळीबारात आज एका सैनिकाला प्राण गमवावे लागले. पाकला भारताकडून सडेतोड उत्तर दिले जात असल्याचे राजनाथ सिंग यांनी बैठकीत सांगितले. मंत्रीसमितीच्या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर तसेच इतर अन्य मंत्री उपस्थित होते.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून अनुचित प्रकार घडलेला नाही. राज्यातील विद्यमान परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. जम्मू काश्मीरच्या भागातील दूरसंचार व टूजी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे नुकतेच पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. सोमवारपासून बहुतांश भागातील शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.