Fri, Jan 24, 2020 05:58
    ब्रेकिंग    होमपेज › None › भूतानमध्ये 100 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक 

भूतानमध्ये 100 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक 

Published On: Aug 17 2019 8:47PM | Last Updated: Aug 17 2019 8:47PM
थिंपू  (भूतान) : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानमध्ये दाखल झाले असून तिथे पंतप्रधानांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. या दौर्‍यात भूतानसमवेत दहा करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे शंभर दशलक्ष डॉलर्सची भूतानमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे मोदी यांनी या दौर्‍यात स्पष्ट केले.

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हजारो मुले आणि महिला हातात भारताचा तिरंगा ध्वज आणि भूतानचा झेंडा घेऊन रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारेच होते. भूतानसोबतचे मैत्रीचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा दोनदिवसीय भूतान दौरा शनिवारपासून सुरू झाला. मोदींचा हा दुसरा भूतान दौरा आहे, तर दुसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यानंतर ते प्रथमच भूतानमध्ये गेले आहेत.

पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधानांना ‘गार्ड ऑफ हॉनर’ देण्यात आला. तिथून पुढे पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा जात असताना स्वागतासाठी हजारो नागरिक रंगबेरंगी वेशांत पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हाती तिरंगा घेऊन उभे होते. जणू एखाद्या उत्सवासारखेच हे वातावरण होते. याचा खास व्हिडीओ परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते रविश कुमार यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.