Sat, Apr 20, 2019 15:48होमपेज › National › योगी सरकारचा केजरीवालांना दणका; ‘रावणा’ला भेटता येणार नाही!

योगी सरकारचा केजरीवालांना दणका; ‘रावणा’ला भेटता येणार नाही!

Published On: Aug 11 2018 11:19AM | Last Updated: Aug 11 2018 11:19AMसहारनपूर: पुढारी ऑनलाईन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने जोरदार दणका दिला आहे. केजरीवाल यांनी  भीम आर्मीच्या प्रमुखांना भेटण्याची विनंती राज्य सरकारकडे केली होती. मात्र योगी सरकारने ही विनंती फेटाळून लावली.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण सध्या सहारनपूर येथील तुरुंगात आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हा पोलिस प्रमुखांनी केजरीवाल यांची मागणी फेटाळून लावली. 

वातावरण बिघडण्याची शक्यता

जिल्हा प्रशासनाच्या मते जर केजरीवाल यांनी तुरुंगात रावण यांची भेट घेतली तर वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. तुरुंगातील नियमानुसार राजकीय नेत कोणत्याही कैद्याला भेटू शकत नाही. सध्या सहारनपूरमध्ये जातीय तणावाचे वातावरण आहे. केजरीवाल आणि रावण यांच्यात राजकीय चर्चा होऊ शकते. तसेच या भेटीनंतर केजरीवाल प्रसारमाध्यमांशी चर्चा देखील करु शकतील, असे तुरुंग अधिक्षकांनी सांगितले. 

केजरीवाल आणि रावण यांची भेट झाली तर राजपूत आणि दलित समाजातील तणाव आणखी वाढू शकते अशी शक्यता जिल्हा प्रशासनाला वाटते. त्याच बरोबर राजकीय नेत्याने तुरुंगात एखाद्या कैद्याची भेट घेतली तर अन्य कैद्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.  

हरीश रावत यांना कशी मिळाली परवानगी, ‘आप’चा सवाल

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाने उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव अनुप पांडेय यांना पत्र लिहून भीम आर्मीचे प्रमुख आझाद उर्फ रावण यांची भेट मिळावी यासाठी परवानगी मागितली होती. ही भेट १३ ऑगस्ट रोजी होणार होती. पण राज्य सरकारने ती फेटाळून लावली. या निर्णयावर ‘आप’ने नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना रावण यांची भेट घेण्याची कशी काय परवानगी देण्यात आली होती, असा प्रश्न 'आप'ने विचारला आहे.