Wed, Jun 19, 2019 08:16होमपेज › National › जम्मू-काश्मीर: कुख्यात अतिरेकी झीनतला कंठस्नान

जम्मू-काश्मीर: कुख्यात अतिरेकी झीनतला कंठस्नान

Published On: Jan 13 2019 8:38AM | Last Updated: Jan 13 2019 8:38AM
श्रीनगर : पुढारी ऑनलाईन

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एके-४७ रायफल आणि इतर साहित्‍य जप्त करण्यात आले आहे. ठार झालेल्‍या दहशतवाद्यांमध्ये दहशतवादी जीनत उल इस्लाम याचाही समावेश असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली. तो अल बद्र या दहशतवादी गटाचा असून, तो इम्प्रुवाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी)(आयईडी) हाताळण्यात तज्ञ होता.

शनिवारी दुपारी कुलगाममध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर संयुक्त शोधमोहीम सुरू करण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी एका घराआडून जवानांवर गोळीबार केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात दोन दहशतवादी ठार झाले. 

दरम्‍यान, काही स्‍थानिक नागरिकांनी दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत करण्याचेही प्रयत्न केले. यावेळी अश्रूधूराचा मारा करण्यात आला. तसेच या भागातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.