Mon, Dec 10, 2018 03:51होमपेज › National › सोशल मीडियावर 'या' गोष्टी शेअर करू नका

सोशल मीडियावर 'या' गोष्टी शेअर करू नका

Published On: Feb 13 2018 5:46PM | Last Updated: Feb 13 2018 5:59PMमुंबईः पुढारी ऑनलाईन

जगभरात विविध ठिकाणी असलेल्या लोकांशी नेहमी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडिया एक चांगले माध्यम आहे. आपल्या लहानपणापासूनच्या मित्रांपासून ते नातेवाईकांपर्यंत सर्वांशी एका क्लिकवर लोक जोडले जात आहेत. अतिशय कमी खर्चात, कमी वेळात आपण आपले विचार जगभरात सोशल मीडियाद्वारे पोहोचवू शकतो.

दिवसभरात आपल्या मनात येत असलेल्या भावना काही लोक लगेचच सोशल मिडीयावर शेअर करतात. बऱ्याच जणांना आपले वेगवेगळ्या मुडचे फोटो तासा-तासाला सोशल मीडियावर शेअर करायची सवय लागलेली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मतानुसार काही गोष्टी आपण सोशल मीडियावर शेअर करणे जाणीपूर्वक टाळले पाहिजे.

जाणूण घेऊया कोणत्या आहेत 'त्या' गोष्टी

नातेसंबंधामधील वाद 

नवरा-बायको अथवा इतर नातेसंबधातील वाद कधीही सोशल मीडियावर शेअर करू नयेत. नवऱ्याने बायकोविषयी किंवा बायकोने नवऱ्याचे दोष दाखवणाऱ्या गोष्टी शेअर केल्यानंतर त्यावर लगेच कमेंट केल्या जातात. त्यातून प्रत्येकजण आपली मते मांडण्याचा प्रयत्न करतात. यातून जर लोकांची निगेटीव्ह मते अधिक येऊ लागली तर आपल्याला ती समस्या खूपच गंभीर आहे असे वाटायला लागते. त्यामुळे त्या व्यक्तिविषयी आपले नकारात्मक मत तयार होऊन नाते तुटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टी सोशल मीडीयावर शेअर करण्यापेक्षा जे असेल त्याविषयी थेट बोलून विषय सोडवण्याचा प्रयत्न करावा.

नग्न फोटो शेअर करू नका

सोशल मीडीयावर आपले किंवा इतरांचे नग्न फोटो शेअर करू नये. आपल्या शरीराचे प्रदर्शन सोशल मीडीयावर करणे गरजेचे नाही. आपला मित्र परिवार आणि नातेवाईकांनी असे फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या मनात आपली वेगळी प्रतिमा निर्माण होऊ शकते. अल्पवयीन मुलेही सोशल मीडीयावर अॅक्टिव असतात, त्यांच्या मनावर याचे वाईट परिणाम होऊ शकतात.

मद्यपान/धुम्रपान करतानाचे फोटो नकोत

दारू/वाईन/बीअर पिण्याची आज-कालच्या तरुणाईमध्ये क्रेझ आहे. बऱ्याच कॉलेजच्या युवकांना दारू पिणे ही मोठेपणाची बाब वाटू लागली आहे. यातून काहीजण दारू पितानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र, काहाही झाले तरी दारू पिणे हे चांगले कृत्य नसल्यामुळे असे फोटो शेअर करू नये. ती एक खासगी गोष्ट असून, ती सार्वजनिक करणे चुकीचे आहे. आज-काल नोकरी देताना बऱ्याच कंपन्या लोकांच्या सोशल प्रोफाईल चेक करतात. त्यामध्ये त्यांना अशा पोस्ट दिसल्यास त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. शिवाय नातेवाईकांच्यामध्ये आपली प्रतिमा खराब होऊ शकते.

आपले मत विनाकारण मांडू नका

सोशल मीडियावर तुमचे मत एखाद्याने मागितले तर ते देणे संयुक्तिक आहे. विनाकारण प्रत्येक ठिकाणी आपले मत मांडण्याचा प्रयत्न करू नये. कोणी कोणतीही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यावर तुम्ही लगेच रिअॅक्ट होणे गरजेचे नाही. प्रत्येक ठिकाणी तुमच्या कमेंटची गरज नाही. त्यामुळे आपल्या मताची किंमत कमी होऊ शकते.     

बँक खाते, पैसे, दागिन्यांविषयी माहिती

आपले बँक खाते, पैसे, दागिन्यांविषयीची कसल्याही प्रकारची माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे. सायबर क्राईंमचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. तुम्ही शेअर केलेल्या माहितीवरून स्मार्टचोर चोरी करू शकतात. काहींना आपण प्रवासाला निघताना कुटुंबासहित बाहेर निघालो आहोत असे सोशल मीडियवर सांगण्याची सवय असते. त्यामुळे चोरट्यांना आयतेच रान मिळते, घरात कोण नसल्याचे जाणून चोरटे डल्ला मारू शकतात.

अपमान करणाऱ्या पोस्ट

मित्र, नातेवाईकांचा अथवा इतर कोणाचाही अपमान झाला असेल, तर त्याविषयीचे फोटो, व्हिडीओ शेअर करणे टाळावे. त्यामुळे त्या व्यक्तिला अपमान झाल्यापेक्षाही सोशल मीडियावर ती गोष्ट शेअर झाल्यामुळे अधिक राग येऊ शकतो. त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. ती पोस्ट जेवढी जास्त शेअर होत राहिल तोपर्यंत त्या व्यक्तिला मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यातून ती व्यक्ति एखादे गैरकृत्य करण्याची शक्यता असते.

चुकीच्या पोस्ट शेअर करू नयेत

आपले समाजात एक चांगले स्थान असताना आपल्याकडून चुकून अथवा जाणीपूर्वक काही चुकीच्या पोस्ट शेअर झाल्या तर त्याचा आपल्या समाजातील स्थानावर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट शेअर करताना अथवा कमेंट करताना दहावेळा विचार करावा. आपल्याकडून आक्षेपार्ह पोस्ट शेअर होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.

आपला किंवा इतरांचा संवाद शेअर करू नका

आपण एकाद्याशी बोलत असताना त्याने व्यक्त केलेले मत अथवा संभाषण आपण सोशल मीडियावर शेअर करू नये. त्याचे ते मत फक्त तुमच्यासाठीचे असेल, त्या मताला असे सार्वजनिक करणे चुकीचे ठरेल. शिवाय इतरांचे सुरू असलेले संभाषणही आपण त्यांच्या परवानगीशिवाय शेअर करू नये. यातून वाद तर होतातच शिवाय त्या व्यक्तिचे आणि आपले संबध दुरावतात.

'अति' शेअर करणे टाळा 

अरे.. हे म्हणजे खूपच झाले! असे लोकांनी आपल्या पोस्टवर म्हणू नये याची काळजी घ्यावी. काही जण टॉयलेटमध्ये बसलेला फोटो, बाथरूम मध्ये घरातील कुत्र्याला धुतानाचा फोटो इत्यादी प्रकारचे किळस वाटणाऱ्या गोष्टी शेअर करतात. असे करणे टाळायला हवे. त्यामुळे लोकांचे आपल्याविषयी खराब मत तयार होऊ शकते.

महत्वपूर्ण/ गुप्त माहिती शेअर करू नये

बँकींग आणि इतर महत्वपूर्ण बाबींची गुप्त माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे. यामुळे आपण स्व:ता आणि इतर लोक अडचणीत येऊ शकतात. माहितीची चोरी होऊ शकते आणि त्याचा विनाकारण मनस्ताप भोगावा लागू शकतो. आपण काम करत असलेल्या कंपनीतील धोरणांची गुप्त माहीती शेअर करू नये, त्यामुळे आपली नोकरी जाण्याची शक्यता असते.