होमपेज › National › ब्लॉग : उर्दुचा शेक्सपिअर इक्बालच्या काव्यातील कामगार हिताचा एल्गार

ब्लॉग : उर्दुचा शेक्सपिअर इक्बालच्या काव्यातील कामगार हिताचा एल्गार

Published On: Apr 16 2018 6:08PM | Last Updated: Apr 16 2018 6:20PMसरफराज अ.रजाक शेख, ॲड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर

विसाव्या शतकाच्या पुर्वाधात इंग्रजी सत्तेचा सूर्य मध्यान्ही तळपत होता. भारतीयांवर परकीय सत्ता आधिकारात होती. माणसं लुटली जात होती. नागवली जात होती. शोषली जात होती. भारतीय समाज संक्रमणावस्थेत होता. अशा काळात इक्बाल आपल्या काव्याचे खङ्ग घेऊन अवतरले. युरोपात मार्क्स ज्या पध्दतीने भांडवलदाराविरोधात उभा राहीला, त्याचपध्दतीने इक्बाल भारतीय उपखंडात वसाहतवादाविरोधात उभे ठाकले. आपल्या शायरीने त्यांनी स्वातंत्र्याच्या प्रेरणा उत्फुल्लीत केल्या. काव्यातून चिंतन आणि चेतनेचे दर्शन घडवत इक्बाल नववविचार मांडत होते. इक्बालांचं काव्य आणि त्यांच चिंतन चतुरस्त्र आहे. त्यामध्ये प्रेमाध्यात्म आहे. रहस्यवाद आहे. जगण्याची जिजिविषा आहे. निसर्गजाणिवा आहेत. गुढता ही तर त्यांच्या काव्याचा आत्मा. मानवी जीवनाच्या नानाविध पारदर्शक, अपारदर्शक संदर्भमुल्यांचा परिचय इक्बालांनी आपल्या काव्यातून नेहमीच करुन दिला. जगणं उदात्त व्हावं. ते आनंदानं बहरावं यासाठी इक्तबालांचं चिंतन. सर्जनशीलता हा त्यांच्या काव्याचा स्वभावधर्म. त्यामुळेच उर्दु काव्याची पृथगात्मता म्हणजे इक्बाल, अशी ओळखच उर्दु काव्याला मिळाली.

मार्क्स आणि इक्बालचा शिकवा, कुफ्र नाही, तर दुःखाचा शोध

मार्क्सने जगातील दुःखाचा शोध घेतला. त्याची कारणे धुंडाळली. समाजात दुःख पसरवणारे स्त्रोत त्याने निश्‍चित केले. शोषणातून दुःखाची निर्मिती होते. हे त्याने ताडले. त्यासाठी धर्म ही व्यवस्था जबाबदार नाही. हे देखील त्याने मान्य केले. पण सामान्यांच्या कल्याणासाठी असलेली धर्म नावाची व्यवस्था, शोषकांच्या मक्तेदारीत अडकल्याचे त्याच्या नजरेने हेरले. मार्क्सची प्रवृत्ती बंडखोराची होती. त्यामूळे तो या धर्ममुखंडांविरोधात उभा राहीला. म्हणून इश्वर आणि माणूस यांच्यातील ‘दलाल’ व्यवस्थेला सुरुंग लागले. मग मार्क्स हा धर्मविच्छेदक असल्याचा प्रचार धर्ममुखंडांनी सुरु केला. तो आजतागायत सुरु आहे. पण मार्क्स इतके धर्माचे कौतुक कोणीच केले नाही. धर्म चांगला असेल. तर त्यातून ऐहीक कल्याण साध्य होतं. या धर्ममुल्यावर त्याची निष्ठा नव्हती काय? धर्म व्यवस्थेवर मळभ दाटलं. त्यामूळे धर्म व्यवस्‍थितपणे कार्यरत होत नाही. हा मार्क्सचा शिकवा (गऱ्हाणे) होता. त्यामुळे त्याने हा शिकवा समाजासमोर मांडला. दास कापिटल म्हणजे मार्क्सच्या गऱ्हाण्याचा संग्रह. म्हणजे शिकवा.

इक्बालांच्या काव्यात कामगार हिताचा एल्गार

कष्टार्जन हा भूमिपुत्रांचा राष्ट्रधर्म. पण, वसाहतीक मुल्यांनी भांडवलदारी आसूयेने मजूरांना वेठीस धरलं. त्यांचं शोषण केलं. इक्बालांनी त्या अन्यायाविरोधात आपल्या शब्दांची शस्त्र उगारली. ‘‘बांगे दिरा’’ हा इक्बालांचा काव्य संग्रह. इतिहास आणि कल्पनांचं मिश्रण त्यात आहे. भावना आणि बुध्दीवादाची सांगड घालून इक्बालांनी आपल्या चिंतनाला त्यात शब्दबध्द केलंयं. ‘‘सरमाया व मेहनत’’ म्हणजे भांडवल आणि मेहनत ही त्या काव्यसंग्रहातली इक्बालांची एक कविता. सांप्रत भांडवलदारी मानसिकतेचा प्रत्यय त्यातून येतो. भांडवलादारी मानसिकतेला  उघडे पाडून इक्बालांनी मजुरांच्या जागृतीचा एल्गार त्यातून पुकारला आहे.  त्यात इक्बाल म्हणतात,

‘‘ बंदाये मज्दूर को जाकर मेरा पैगाम दे
खिज्र का पैगाम क्या, है ये पयामे कायनात ।।१।।
अय्‌ तुमको खा गया के सरमायादारे हीलागर
शाखे आहू पर रही  सदियोंतलक तेरी बरात ।।२।।’’

मजुरांचे दुःखी कष्टी जिणे इक्बालांना पहावत नाही. त्यांच्या हळव्या मनाला त्यामूळे वेदना होतात. ते मजुराला संदेश देतात. म्हणतात, मजूराला या स्थितीतून सावरता यावं यासाठी हा माझा संदेश आहे. माझा हा संदेश त्यांना द्या. हा फक्त माझाच नाही तर साऱ्या सृष्टीचा संदेश आहे. (हे मजूरांनो,श्रमिकांनो) त्या धुर्त भांडवलदारांनी (सरमायादार) तुम्हाला संपवले आहे. तुझ्या क्षमतांना गिळंकृत केले आहे. त्यांच्या इच्छेवर तुझी मजूरी ठरत आहे. कार्ल मार्क्स ने श्रम मुल्य आणि वस्तुचे बाजार मुल्य यातील तफावत सांगितली. कोणत्याही वस्तूचे वरकड मूल्य ( अतिरिक्त मुल्य / सरप्लस व्हॅल्यु ) हे भांडवलदाराकडून श्रमिकांच्या होणाऱ्या शोषणाचे प्रतीक असल्याचे तत्व त्याने शोधून काढले. वरकड मुल्यात मजूरांनाही वाटा, मिळेल अशी व्यवस्था निर्माण करणे हे मार्क्सचे स्वप्न म्हणता येईल.

‘‘ दस्ते दौलत आफरी को मुज्दायौ मिलती रही
अहले सरवत जैसे देते है गरीबोंको जकात ।।३।।
साहीरे अल्मुतने तुझ को दिया बर्गे हशीश
और तु अय्‌ बेखबर समझा उसे शाखे नबात ।।४।।’’

मजूर हा श्रीमंताची गरज असतो. पण त्या गरजेचं प्रदर्शन मात्र श्रीमंत भांडवलदार कटाक्षानं टाळतात. मजूराला काम देऊन जणू काही ते मजूरावर उपकार करत आहेत. अशा अविर्भावात वागतात. श्रीमंतांनी गरिबाच्या तोंडावर जकात फेकावी, त्यापध्दतीने श्रीमंतांची संपत्ती आपल्या कष्टातून उभी करणाऱ्या मजुरांना मजूरी मिळत असते. या अन्यायाची जाणीव कामगारांना होत नाही. जणू काही अल्मुत नावाच्या पर्वतावरील जादुगाराने त्यांना हशीशचे मादक द्रव्य देउन गुंग केले आहे. त्यामुळेच ते हशीश सारख्या मादक द्रव्याला ते कल्पवृक्ष समजत आहेत. म्हणजे मजूर हे त्यांचे शोषण करणाऱ्या भांडवलदारांनाच आपला मुक्तीदाता मानत आहेत.

‘‘ नस्ल,कौमीयत,कलीसा,सल्तनत,तहजीब,रंग
‘‘खाजगी’’ ने खूब चुनचुनकर बनाये मुस्कीरात ।।५।।
कट मरा नादां खियाली देवतांओ के लिये
सुक्र कि लज्जत में तु लुटवागया लज्जते हयात ।।६।।’’

मजुरांना भूलवण्यासाठी त्यांना त्यांच्या कल्याणाच्या मार्गापासून भटकवण्यासाठी नेत्यांनी मोहमयी विषयांची निर्मिती केली आहे. वंश, राष्ट्रवाद, मठ, राज्य, संस्कृती, वर्ण ही सर्व त्या नेत्यांनी मजुरांसाठी बनवलेली मादक द्रव्ये आहेत. नादान मजूरा तू या खोट्या दैवतांच्या (मादक द्रव्यांच्या) व्यर्थ मागे पडला आहेस. त्यातूनच तुझं मरण ओढावलयं. समाधिसुखासाठी तु ऐहीक जीवन मात्र गमावलंस. त्याला तुझ्या नादानपणामुळे उद्ध्वस्त करुन घेतलंस.

‘‘ मक्र की चालों से बाजी ले गया सरमायादार
इंतिहाये सादगीसे खा गया मज्दूर मात ।।७।।
उठ के बज्में जहां का और ही अंदाज है
मशरीक व मगरीब में तेरे दौर का आगाज है ।।८।।’’

भांडवलदार हे धुर्त आहेत. त्यांनी आपल्या धुर्तखेळीने विजय मिळवला. त्यांच्या धुर्तपणामुळेच श्रमिकांनी अत्यंत साधेपणाने पराभव स्वीकारला. पण  हे मज्दूरा आता उठ. ही पराभूत मानसिकता त्याग. पुर्व आणि पश्चीमेत तुझ्या युगाची नांदी सुरू झाली आहे.

‘‘ हिंमते आली तो दरिया भी नहीं करती कुबूल
गुंचा सैं गाफील तरे दामन मे शभनम कबतलक ।।९।।
नग्मायें बेदारीये जमहूर है सामाने ऐश
किस्साये खाबआवरे इस्कंदारो जम कबतलक ।।१०।।’’

श्रमिक आहे म्हणून मजदुरांनी किती दिवस न्यूनगंडात रहावे. त्यांनी क्रांतीची मशाल पेटवावी. मजुरांनी क्रांतीप्रवण व्हावं म्हणून इक्बाल भांडवलदारांच्या विरोधात मजुरांना धैर्य देतात. इक्बाल मजुरांना म्हणतात, दृढनिश्चय असेल तर कोणतीही बाब असाध्य नाही. किती दिवस फुलात दवबिंदू असावेत त्याप्रमाणे तू आसवांनी आपले कपडे भिजवत राहशील. बहूजनांमध्ये बेदारी (जागृती) निर्माण करणारे गीत आनंददायी आहे. तुला मोहीत करणाऱ्या सिकंदर आणि जमशेदच्या गोष्टी तू किती दिवस ऐकत बसणार आहेस.