Sun, Oct 20, 2019 06:59होमपेज › National › 'भाजप पैशाच्या जोरावर सरकार पाडत आहे' 

'भाजप पैशाच्या जोरावर सरकार पाडत आहे' 

Published On: Jul 12 2019 8:18PM | Last Updated: Jul 12 2019 8:06PM
अहमदाबाद : पुढारी ऑनलाइन

कर्नाटकमधील काँग्रेस-निजदच्या १० आमदारांच्या राजीनाम्यापासून सुरू असलेल्या कर्नाटक सरकारच्या गोंधळावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर आरोप केला. भाजप पैशांचा वापर करून राज्य सरकार पाडत आहे, याआधी गोव्यात, पूर्वोत्तर भारतात पैशांच्या जोरावर भाजपने सरकारे पाडली आणि आता कर्नाटकमध्येही तेच करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

अहमदाबादमधील एका न्यायालयात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीसाठी राहुल गांधी आज अहमदाबादला आले होते. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे. न्यायालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी कर्नाटकातील घटनाक्रमावरून भाजपवर जोरदार टीका केली. 

काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार अस्थिर झाले आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. अशातच राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे. 

दरम्यान, दहा आमदारांच्या राजीनाम्यावर आणि त्यांच्या अपात्रतेबाबत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिले आहेत. शिवाय विधानसभा सभापतींना आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यास मंगळवारपर्यंत मुदत दिली आहे. तर याचदिवशी म्हणजे १६ जुलै रोजी राजकीय घडामोडींविषयी दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यामुळे कर्नाटकातील राजकीय स्थिती पुढील चार दिवस जैसे थे राहणार आहे.