Mon, Nov 20, 2017 17:24होमपेज › National › 'त्‍या' विद्यार्थ्याचा बाल संरक्षण अधिकार्‍यांसमोर खुलासा  

'मी प्रद्युम्‍नची हत्‍या केली नाही' 

Published On: Nov 15 2017 12:14PM | Last Updated: Nov 15 2017 12:14PM

बुकमार्क करा

गुरुग्राम : : वृत्तसंस्‍था

रायन इंटरनॅशनल स्‍कूलचा विद्‍यार्थी प्रद्युम्न ठाकुर याच्‍या हत्‍येप्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात अकरावीच्‍या वर्गात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याचा अटक करण्‍यात आली आहे. त्‍याची सीबीआयकडून चौकशीही सुरु आहे. दोन दिवसांपुर्वीच 'त्‍या' विद्‍याथ्‍याने गुन्‍हा कबूल केल्‍याचे ज्‍युवेनाईल जस्टिस बोर्डाने म्‍हटले होते. मात्र, आता त्‍या विद्यार्थ्याने बाल संरक्षण अधिकार्‍यांसमोर आपण हत्‍या केली नाही, असे म्‍हटले आहे. सीबीआय या प्रकरणात आपल्‍याला फसवत असल्‍याचेही त्‍याने म्‍हटले आहे. तर दुसरीकडे सीबीआयने धमकावल्‍यामुळे माझ्‍या मुलाने घाबरुन गुन्‍हा कबूल केला, असे त्‍या विद्यार्थ्याच्‍या वडिलांनी म्‍हटले आहे.   

गुन्‍हा कबूल न केल्‍यास आपल्‍या मोठ्‍या भावाला मारण्‍याची धमकी सीबीआयने दिल्‍याचे त्‍या विद्यार्थ्याने नुकताच म्‍हटले होते. तर दोन दिवसांपूर्वीच ज्‍युवेनाईल जस्‍टिस बोर्डाने त्‍या विद्यार्थ्यानेच प्रद्युम्‍नची हत्‍या केल्‍याचे म्‍हटले होते. मात्र, आता त्‍या  विद्यार्थ्याने बाल संरक्षण अधिकार्‍यासमोर आपण निर्दोष असल्‍याचे म्‍हटले आहे. आपणास या प्रकरणात फसवले जात असल्‍याचेही त्‍याने बाल संरक्षण अधिकार्‍यांना सांगितले आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्‍या माहितीनुसार, त्‍या विद्यार्थ्याच्‍या वडिलांनी म्‍हटले आहे, 'सीबीआय माझ्‍या मुलाला धमकावून गुन्‍हा कबूल करण्‍यास भाग पाडत आहे. जर गुन्‍हा कबूल केला नाही तर कुटुंबाला मारण्‍याची धमकी सीबीआयकडून देण्‍यात आली. त्‍यामुळेच माझ्‍या मुलाने गुन्‍हा कबूल केला' 

सूत्रांच्‍या माहितीनुसार, बाल संरक्षण अधिकार्‍याने सोमवारी त्‍या विद्यार्थ्याला विश्‍वासात घेऊन चौकशी केली. या चौकशीनंतर संबंधित बाल संरक्षण अधिकार्‍याने म्‍हटले, 'तो विद्‍यार्थी शांत स्‍वभावाचा दिसत होता. मी त्‍याला म्‍हटले की, मी बाल संरक्षण अधिकारी आहे. तू कोणतीही भीती न बाळगता मला सर्व काही सांग. यानंतर त्‍याने मी कोणाचीही हत्‍या केली नसल्‍याचे म्‍हटले. मला फसवले जात आहे, असेही त्‍याने सांगितले.'