Sun, Jun 07, 2020 01:59होमपेज › National › आज मी प. बंगालमध्ये जातोय, पाहू दीदी काय करतात : पीएम मोदी  

आज मी प. बंगालमध्ये जातोय, पाहू दीदी काय करतात : पीएम मोदी  

Published On: May 16 2019 2:53PM | Last Updated: May 16 2019 2:45PM
मऊ/चंदौली : पुढारी ऑनलाईन 

पश्चिम बंगालमध्ये घडलेल्‍या हिंसक घटनांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. उत्‍तर प्रदेशच्या मऊ आणि चंदौलीमध्ये गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्‍यांनी म्‍हटले की, आज पुन्हा एकदा माझी पश्चिम बंगालमध्ये सभा आहे. आता पाहू की ममता दीदी माझी सभा होऊ देतात की नाही. अशा प्रकारे बोलून मोदी यांनी ममतांना एकप्रकारे आव्हान दिले. 

पंतप्रधान मोदी यांनी सभेत बोलताना काही महिन्यापूर्वी पश्चिम मदनापूरच्या माझ्‍या सभेमध्ये टीएमसीच्या कार्यकत्‍यांनी गोंधळ घातल्‍याचा आरोप केला. इतकेच नाही तर, ठाकुरनगरमध्ये तर परिस्‍थिती इतकी बिघडली की, मला माझे भाषण मध्येच थांबवून व्यासपीठावरून बाजूला जाण्याची वेळी आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आजच्या सभेविषयी बोलताना मोदी म्‍हणाले की, आज पश्चिम बंगालच्या दमदममध्ये माझी सभा आहे, पाहू मग ममता दीदी मला तेथे सभा घेऊ देतात की नाही. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्‍तव्यामुळे सर्वांचे लक्ष पंतप्रधान मोदी यांच्या सभेकडे लागले आहे.

तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्‍यान झालेल्‍या हिंसाचारात ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड टीएमसीनेच केल्‍याचा आरोपही मोदी यांनी केला. तसेच विद्यासागर यांच्या दूरदृष्टीला आमचे सरकार समर्पित असून, त्‍याच जागी आम्‍ही पंचधातूची नवीन पुतळा स्‍थापित करू, असे त्‍यांनी सांगितले. 

याआधी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जींवर आरोप करताना, तृणमूल काँग्रेसने आतापर्यंत आमच्या ७० सभांना बंदी घालण्याचे काम केले असल्‍याचे सांगितले.