Thu, Apr 25, 2019 05:16होमपेज › National › आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या उपोषणस्थळी एकाची आत्महत्या  

चंद्राबाबू नायडूंच्या उपोषणस्थळी एकाची आत्महत्या

Published On: Feb 11 2019 10:55AM | Last Updated: Feb 11 2019 5:13PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एक दिवसाच्या उपोषणाला प्रारंभ केला आहे. या उपोषणामध्येच आंध्रमधील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्या व्यक्तीच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट मिळाली आहे. त्याने आपली स्थिती खराब असल्याचे नोटमध्ये नमूद केले आहे. 

आंध्रला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी नायडूंनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. आंध्र भवनमध्ये त्यांनी उपोषणाला प्रारंभ केला. उपोषणाला प्रारंभ करण्यापूर्वी नायडूंनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी बोलताना पीएम मोदींवर टीकास्त्र सोडले. त्यांनी वैयक्तिक टीका थांबवावी असे नायडू म्हणाले. 

आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा तसेच राज्याची निर्मिती करण्यात आली त्यावेळी जी वचने देण्यात आली होती, ती पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. आंध्रचे विभाजन झाल्याने तसेच विभाजनावेळी आंध्रावर अन्याय झाल्याने चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम केला होता.

तेलुगू देसम पक्षाने दिलेल्या माहितीनुसार उपोषण रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. उद्या (ता.१२) ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना  निवेदन सुद्धा देणार आहेत.