Thu, May 23, 2019 22:29
    ब्रेकिंग    होमपेज › National › ड्रायव्‍हिंग लायसन्‍स, RC बूक खिशात नाही इथं ठेवा!

ड्रायव्‍हिंग लायसन्‍स, RC बूक खिशात नाही इथं ठेवा!

Published On: Aug 10 2018 3:45PM | Last Updated: Aug 10 2018 3:45PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

केंद्रीय परिवहन मंत्रालयाने दिलेल्या नव्या निर्देशानुसार आता वाहतूक परवाना (ड्रायव्‍हिंग लायसन्‍स), वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बूक) आणि विम्यासंदर्भातील कागदपत्रे जवळ बाळगण्याची गरज नसणार आहे. ही कागदपत्रे जवळ नसल्याने कोणताही वाहतूक पोलिस तुमची अडवणूक करू शकणार नाही. परंतु त्यासाठी आपल्याला आपली सर्व महत्त्‍वाची कागदपत्रे आपल्या खिशाऐवजी दुसर्‍या एका सुरक्षित ठिकाणी ठेवावी लागणार आहेत. 

परिवहन मंत्रालयाने आपली कागदपत्रे इलेक्‍ट्रानिक स्‍वरूपात डिजिलॉकर किंवा एम परिवहन सारख्या प्‍लॅटफॉर्मवर ठेवल्यास आपल्याला ती जवळ बाळगण्याची गरज नसल्याचे स्‍पष्‍ट केले आहे. या माध्यमांवर उपलब्ध कागदपत्रांच्या प्रती या मूळ प्रतिप्रमाणे मानण्यात येणार आहेत. मंत्रालयाकडे इ-कागदपत्रे ग्राह्य मानली जात नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर परिवहन मंत्रालयाने याबाबत निर्देश दिले आहेत. 

काय आहे डिजिलॉकर (DIGIlocker)?

सरकारी वेबसाईट digilocker.gov.in हा एक डिजिटल प्‍लॅटफॉर्म आहे. याठिकाणी आपण आपली महत्त्‍वाची कागदपत्रे सुरक्षितरित्या डिजिटल स्‍वरुपात ठेवू शकता. तसेच ही कागदपत्रे शेअर आणि प्रमाणितही करू शकता. गेल्याचवर्षी ही सुविधा भारत सरकारने सुरू केली आहे. याचा उद्देश आपली खासगी आणि सरकारी कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवणे हा आहे. याद्वारे आपल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती कायम जवळ बाळगण्याची गरज पडत नाही. तर जिथे गरज असेल तिथे आपण या डिजिटल कागदपत्रांचा वापर करू शकता. त्यामुळे मूळ प्रती खराब होणे, गहाळ होणे किंवा हाताळण्यातील समस्यांना सामोरे जावे लागत नाही. 

डिजिलॉकरची सुविधा कशी घेणार?

आपल्याला डिजिलॉकरची सुविधा घ्यायची असेल तर आपल्याला अगोदर साइनअप किंवा रजिस्‍टर करावे लागेल. यामध्ये आपला आधार क्रमांक आणि त्याला जोडलेल्या मोबाईल नंबरद्वारे ही नोंदणी करावी लागेल. एकवेळच्या पासवर्डद्वारे (ओटीपी) आपण आपल्या खात्यात पहिल्यांदा जाऊ शकता. परंतु त्यानंतर आपल्याला ओटीपीची गरज पडणार नाही. आपण आपला स्‍वत:चा पासवर्ड तयार करू शकता. त्यानंतर गूगल आणि फेसबुकद्वारे आपण लॉगइन करू शकता. आपण साइनअप केल्यानंतर आपली सर्व महत्त्‍वाची कागदपत्रे यात अपलोड करू शकता. 

डिजिलॉकर ॲपही उपलब्ध आहे. digilocker.gov.in वर जाऊन हे ॲप डाऊनलोड करा. तसेच गूगल प्‍लेस्‍टोअरवरूनही हे ॲप डाऊनलोड करता येईल. यामध्ये पहिल्यांदा Sign Up करा. आधार आणि मोबाईल नंबरने रजिस्‍टर करा. ओटीपी टाकून डिजिलॉकरमध्ये जाल तेव्‍हा स्‍वत:चा पासवर्ड तयार करा. 

डिजिलॉकरमध्ये आपली कागदपत्रे कशी ठेवणार?

►डिजिलॉकर खाते काढा. त्यामध्ये अपलोड बटनवर क्‍लिक करा आणि आपल्या लोकल ड्राइव्‍हमधून फाईल सिलेक्‍ट करून open वर क्‍लिक करा. अपलोडिंग सुरू होईल. 

►डॉक्युमेंट (कागदपत्रे) प्रकारानुसार अपलोडिंग करायचे असल्यास 'select doc type' वर क्‍लिक करा. त्यानंतर खाली आपल्याला डॉक्युमेंटचा प्रकार सिलेक्‍ट करावा लागेल. गरजेनुसार त्यावर क्‍लिक करून सेव्‍ह बटनावर क्‍लिक करा. 

►डॉक्युमेंट अपलोड करताना आपल्याला फाईलचे नावही बदलता येऊ शकते. 

डिजिलॉकरमध्ये काय ठेवू शकता?

गेल्या वर्षी ऑगस्‍ट महिन्यात डिजिलॉकरमध्ये ७८ लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली. यामध्ये वाहतूक परवाना, कोणत्याही प्रकारची नोंदणीची प्रमाणपत्रे, पीयूसी प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, आयकर परताव्यासंबंधित कागदपत्रे, शाळा-महाविद्यालयातील गुणपत्रके आणि प्रमाणपत्रे, घर, जमीन आदी मालमत्तांशी संबंधित कागदपत्रांसारखी खासगी आणि सरकारी कागदपत्रे आपण ठेवू शकतो.