Sun, Oct 20, 2019 07:14होमपेज › National › सत्तेत आलो तर नोटाबंदीची चौकशी करू : काँग्रेस

सत्तेत आलो तर नोटाबंदीची चौकशी करू : काँग्रेस

Published On: Nov 09 2018 9:06PM | Last Updated: Nov 09 2018 11:28PMनवी दिल्ली/भोपाळ : पीटीआय/ वृत्तसंस्था 

नोटा बंदीच्या निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये नोटा बंदीविरोधात तीव्र निदर्शने केली. 2019 साली सत्तेत आल्यास मोदी यांच्या नोटा बंदीच्या महाघोटाळ्याची चौकशी करणार, असा इशारा काँग्रेसने दिला. तर समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीसह अन्य विरोधी पक्षांनीही नोटा बंदीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविला. दरम्यान, चार पिढ्यांनी कमावलेला काळा पैसा मातीमोल झाल्यामुळेच काँग्रेससह विरोधी पक्ष अस्वस्थ झाल्याचा पलटवार भाजपने केला.

8 नोव्हेंबर 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी नोटा बंदीच्या निर्णयाचे समर्थन करीत, देशाचा विकास दर वाढत असल्याचे सांगितले. नोटा बंदीमुळे करसंकलनात वाढ होऊन देशाची अर्थव्यवस्था झेपावत असल्याचा दावाही त्यांनी केला. तथापि, नोटा बंदीविरुद्ध काँग्रेससोबत एकवटलेल्या विरोधकांनी नोटा बंदीचा निर्णय फसवा असल्याचा आरोप देशातील अनेक राज्यांमध्ये निदर्शने केली. काँग्रेसने दिल्लीत कँडल मोर्चा काढत केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आरबीआयच्या कार्यालयासमोरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला होता. आरबीआयच्या कार्यालयासमोर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. निदर्शनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत, आनंद शर्मा, भूपेंद्रसिंग हुडा आदींसह सुमारे 80 युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले होते. 

कष्टाचे पैसेवाले रांगेत, काळा पैसेवाले फरार : राहुल

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, नोटा बंदीदरम्यान सर्वसामान्यांनी लांबच लांब रांगांमध्ये थांबण्याचे कष्ट घेतले. मात्र, कोणीही काळा पैसा असणार्‍यांना या रांगेमध्ये पाहिले नाही. नीरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी आणि मेहूल चोक्सी हे आपले पैसे घेऊन देशातूनच फरार झाले. हा निर्णय पूर्णपणे फसला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस नेेत रणदीप सुरजेवाला म्हणाले की, नोटा बंदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. काळा पैसा आणि बनावट नोटांना आळा बसेल, असा युक्तिवाद मोदी यांनी घोषणेवेळी केला होता. मात्र, यातील एकही उद्देश सफल झालेला नाही. नोटा बंदीनंतर दहशतवाद आणि नक्षली कारवायांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे नोटा बंदी हा मोदीनिर्मित (मोदी मेड) महाघोटाळा आहे. 2019 साली केंद्रात सत्तेत आल्यानंतर नोटा बंदीसह भाजपने केलेल्या अन्य घोटाळ्याची चौकशी करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपच्या अध्यक्ष मायावती यांनीही नोटा बंदीने कोणताही हेतू साध्य झाला नसल्याची टीका केली. रोजगारवृद्धीही घटली आहे. त्यामुळे नोटा बंदीचा नेमका काय लाभ झाला, याचा खुलासा केंद्र सरकारने करावा, अशी मागणीही उभय नेत्यांनी केली.  दरम्यान, भ्रष्टाचाराविरोधातील प्रत्येक निर्णयाला काँग्रेस का विरोधी करीत आहे, असा सवाल करणारे दहा प्रश्‍न भाजपच्या वतीने काँग्रेसला विचारण्यात आले आहेत.