Fri, Apr 26, 2019 20:13होमपेज › National › 'एनडीए'मध्ये मतभेद; जागा वाटपावरून घटक पक्ष नाराज

'एनडीए'मध्ये मतभेद; जागा वाटपावरून घटक पक्ष नाराज

Published On: Nov 09 2018 2:56PM | Last Updated: Nov 09 2018 2:57PMपाटणा (बिहार) : पुढारी ऑनलाईन

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) जागा वाटपाबाबत एकमत झालेले नाही. याच मुद्यावरून एकूणचं भाजप आणि बिहारमधील घटक पक्षांमध्ये संबंध ताणले गेले असल्याचे दिसते.  

नीतिशकुमार यांचा जनता दल (संयुक्त), रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष (एलजेपी) आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोकसमानता पक्ष (आरएलएसपी) हे एनडीएमधील घटक पक्ष आहेत. मात्र, या घटक पक्षांनी २०१४ मध्ये जेवढ्या जागा लढविल्या होत्या; तेवढ्याच जागा २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी लढविण्याची मागणी केली आहे. आम्ही कमी जागांवर निवडणूक लढविणार नाही, असे घटक पक्षांनी स्पष्ट केल्याने भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. यामुळे भाजप आणि जेडीयू यांच्यामधील ५०-५० फॉम्युर्ला अयशस्वी होताना दिसत आहे.

बिहारमधील लोकसभेच्या ४० जागांपैकी भाजप आणि जेडीयू ३४ जागा लढवू शकतात. उर्वरित ६ जागा एलजेपी आणि आरएलएसपी या पक्षांना देण्यात येणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. भाजपने २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत २२ जागा जिंकल्या होत्या. तर रामविलास पासवान यांच्या एलजेपी पक्षाने सात जागा लढविल्या होत्या. यातील सहा जागांवर त्यांनी विजय मिळवला होता. तर उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाने ३ जागा जिंकल्या होत्या. पासवान आणि कुशवाह हे दोघेही सध्या केंद्रामध्ये मंत्री आहेत.

एलजेपीचे बिहार युनिटचे प्रमूख पशुपती पारस यांनी, सध्या जागा वाटपावरून सुरू असलेल्या अफवा खोट्या असल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत एनडीएमधील घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करत नाहीत; तोपर्यंत जागा वाटपावर तोडगा निघणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही सात जागा लढविणार आहोत. गेल्या निवडणुकीत आम्ही सात जागांपैकी सहा जागांवर विजय मिळवला होता. केवळ एक जागा ७ हजार मतांने हुकली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाची कामगिरी उंचावलेली आहे. त्यासाठी आमच्याकडे जेवढ्या जागा आहेत तेवढ्या का मिळू नयेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

५०-५० फॉम्युल्याचा अर्थ काहीही असू शकतो. भाजप आणि जेडीयू प्रत्येकी १० जागा लढवतील आणि उर्वरित २० जागा अन्य घटक पक्षांसाठी दिल्या जातील, असेही ते म्हणाले. तसेच राष्ट्रीय लोकसमानता पक्षाने ३ पेक्षा कमी जागा आम्हाला नको आहेत, अशी भूमिका घेतली आहे.

५०-५० फार्म्युला...
दरम्यान, भाजप आणि जेडीयू यांच्यातील जागा वाटपाबाबत भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्यात हल्लीच चर्चा झाली होती. या चर्चेनंतर दोघा नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाबाबत तोडगा निघाला असल्याचे जाहीर केले होते. यावेळी अमित शहा यांनी दोन्ही पक्ष ५०-५० फार्म्युल्यावर निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर दोन्ही पक्ष १७-१७ जागा लढविणार असून उर्वरित ६ जागांपैकी ४ एलजेपी आणि २ आरएलएसपी पक्षांना दिला जाणार असल्याची माहिती पुढे आली होती.