Sun, Oct 20, 2019 06:52होमपेज › National › गॅस सिलिंडर पुन्हा महागला; डीलर्सचे कमिशन वाढविले

घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला

Published On: Nov 09 2018 5:30PM | Last Updated: Nov 09 2018 9:19PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलिंडरमध्ये आणखी २ रुपयांची वाढ झाली आहे. तेल मंत्रालयाने एलपीजी डीलर्सच्या कमिशनमध्ये वाढ केल्यानंतर सिलिंडरचा दरही वाढविला आहे. सिलिंडर महागण्याची या महिन्यातील दुसरी वेळ आहे. याआधी १ नोव्हेंबर रोजी सिलिंडरचा दर २.९४ रुपयांनी वाढविला होता.

यामुळे दिल्लीत अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत ५०५.३४ रुपयांवरून ५०७.४२ रुपयांवर पोहचली आहे. तर मुंबईत १४.२ किलोच्या सिलिंडरचा दर ५०५.०५ रुपये, कोलकातामध्ये ५१०.७० रुपये आणि चेन्नईत ४९५.३९ रुपये झाला आहे. प्रत्येक राज्यातील दर तेथील कर आणि वाहतूक खर्चानुसार वेगवेगळे आहेत.

सप्टेंबर २०१७ मध्ये डीलर्सना १४.२ किलो आणि ५ किलो वजनाच्या सिलिंडरसाठी अनुक्रमे ४८.८९ आणि २४.२० रुपये एवढे कमिशन निश्चित केले होते. मात्र, वाहतूक खर्च, पगार आदी गोष्टी लक्षात घेऊन एलपीजी डीलर्सचे कमिशन १४.२ किलो सिलिंडरसाठी ५०.५८ रुपये आणि ५ किलोच्या सिलिंडरसाठी २५.५९ रुपयांपर्यंत वाढविले आहे, असे तेल मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

जीएसटीमुळे जूनपासून दर महिन्याला सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे.